
सोलापूर: वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारकऱ्यांचा पारंपरिक आणि श्रद्धेने भरलेला पालखी सोहळा महाराष्ट्रभर सुरू असताना, आजमी यांनी या सोहळ्यावर टीका करत वादाचे नवे पेव फोडले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना आजमी म्हणाले, "पालख्यांमुळे रस्ते जाम होतात. हिंदू धर्माचे अनेक सण रस्त्यांवर साजरे केले जातात, पण मुस्लिम समाजातील कुणीही त्याविरोधात तक्रार करत नाही. मग आम्ही जर केवळ दहा मिनिटं रस्त्यावर उभं राहून नमाज पठण केलं, तर त्यावरच आक्षेप का घेतला जातो?"
याच मुद्द्यावरून उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. "रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिली जाते. हा द्वेष आणि दुटप्पीपणा नाही का?" असा प्रश्न उपस्थित करत आजमी यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
यावेळी नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. "महाराष्ट्रात मंत्री होणाऱ्या नेत्यांना दोन वेळा शपथ घ्यावी लागते, पण तरीही ते जातीवादाचं राजकारण करतात," असा आरोप करत आजमी यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.
भाषिक प्रश्नांवर भाष्य करताना अबू आजमी म्हणाले, "महाराष्ट्रात मराठीला योग्य सन्मान मिळावा हे खरंच महत्त्वाचं आहे. मात्र, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकसंध हिंदी भाषा असणे गरजेचे आहे. मराठी, हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी हे भाषिक सूत्र राज्यात असावे," अशी भूमिका त्यांनी मांडली.
याशिवाय, आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही त्यांनी मत व्यक्त केले. "इजरायल-इराण संघर्षात अमेरिका सरळ इजरायलच्या बाजूने उभी आहे. निष्पाप पॅलेस्टिनी बालकांचा बळी जात असताना अमेरिका गप्प का?" असा संतप्त सवाल आजमी यांनी उपस्थित केला. भारताने इराणला पाठिंबा द्यावा, अशी मागणी करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. "इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारताने अनेक पॅलेस्टिनी नागरिकांना आश्रय दिला होता. आता त्या परंपरेचा सन्मान राखावा," असे ते म्हणाले.
आजमींच्या या विधानांमुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. एकीकडे पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लाखो वारकरी भक्तीमय वातावरणात सहभागी होत आहेत, तर दुसरीकडे अशा वक्तव्यांमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.