
मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसेने आयोजित केलेल्या आंदोलनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ओम शांती चौकात मनसे कार्यकर्ते जमले असताना, पोलिसांनी परवानगी नाकारली आणि मध्यरात्रीपासूनच मनसेच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. सकाळी आंदोलनस्थळी पोहोचलेल्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.
फडणवीस म्हणाले की, “कोणीही मोर्चा काढण्याची परवानगी मागितली, तर ती दिली जाते. पण पोलिसांनी मला स्पष्ट केलं की, या मोर्चासाठी निवडलेला मार्ग जाणीवपूर्वक असा होता की, तिथे संघर्ष होण्याची शक्यता होती. काही व्यक्तींविषयी पोलिसांकडे विशेष इनपुट्स होते. त्यामुळे त्यांना वाटलं की, कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते.” पोलिसांनी मनसेला नेहमीच्या मार्गाचा पर्याय सुचवला होता, पण मनसेने ठामपणे नकार दिला. “आम्ही हाच मार्ग घेणार,” असा पवित्रा घेतल्यामुळे परवानगी नाकारण्यात आली, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
“अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चासाठी जो मार्ग निश्चित करण्यात आला, त्यावर त्यांनी कुठलाही आडकाठी न आणता शांततेत मोर्चा काढला. मात्र मनसेने विशिष्ट मार्गावरच मोर्चा काढण्याचा आग्रह धरला. हा मार्ग संवेदनशील होता आणि पोलिसांना कायदा-सुव्यवस्था सांभाळणं कठीण झालं असतं,” असंही फडणवीसांनी सांगितलं.
फडणवीस पुढे म्हणाले, “कुठल्याही संघटनेला मोर्चा काढायचा अधिकार आहे. पण जर अशा प्रकारे आंदोलन केलं गेलं की जिथे शांतता भंग होईल, तर ती परवानगी देणं योग्य नाही. जर योग्य मार्ग निवडून परवानगी मागितली, तर ती आजही मिळू शकते, उद्याही मिळेल. पण कायदा हातात घेतल्यास अशा मागण्या मान्य करता येत नाहीत.”
मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केलं की, एकाच राज्यात सर्वांना मिळून राहायचं आहे, आणि राज्याच्या विकासासाठी एकसंघ विचार करणं गरजेचं आहे. “भावना महत्त्वाच्या आहेत, पण त्या व्यक्त करताना शांततेचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे,” असं फडणवीस म्हणाले.
मराठी अस्मितेचा मुद्दा जितका भावनिक आहे, तितकाच कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दाही गंभीर आहे. या दोहोंमध्ये समतोल राखतच पुढे जाणं हेच शासनाचं आणि समाजाचं उद्दिष्ट असायला हवं.