Pratap Sarnaik Mira Bhayandar Morcha : "हिंम्मत असेल तर अडवा!", प्रताप सरनाईक यांचे पोलिसांना खुले आव्हान

Published : Jul 08, 2025, 01:45 PM ISTUpdated : Jul 08, 2025, 01:50 PM IST
Pratap Sarnaik

सार

अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला सडेतोड उत्तर देण्यासाठी ठाकरेंकडून मीरा-भाईंदरमध्ये मोर्चाचे आवाहन करण्यात आले होते. पण त्याधीच पोलिसांनी धरपकड सुरू केली. अशातच प्रताप सरनाईक देखील मोर्चाच्या येथे निघत त्यांनी हिंमत असेल कर अडवा असे विधान केलेय.

ठाणे : मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मंगळवारी मनसे आणि मराठी एकीकरण समितीने मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारत मनसे कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलिसांवर संताप व्यक्त करत थेट आव्हान दिलं.

प्रताप सरनाईक म्हणाले, "पोलिसांची गुंडगिरी सहन केली जाणार नाही. मी स्वतः मीरा-भाईंदरच्या मोर्चात सहभागी होतोय. पोलिसांची हिंम्मत असेल तर मला अडवून दाखवा." त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध करत सरकारलाही इशारा दिला.

 

 

वाद नेमका काय?

मीरा रोड पूर्वेतील 'जोधपूर स्वीट्स आणि नमकीन' या दुकानात मराठी न बोलल्याच्या कारणावरून मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात मोर्चा काढत बंद पुकारला. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसे आणि मराठी संघटनांनी आज (मंगळवारी) मोठ्या संख्येने मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली आणि कार्यकर्त्यांना नोटिसा बजावत अटक केली.

"मराठी माणूस मीरा-भाईंदरच्या दिशेने निघालाय" – संदीप देशपांडे

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकार आणि पोलिसांवर सडकून टीका केली. "आता महाराष्ट्राचा मराठी माणूस मीरा-भाईंदरच्या दिशेने निघालाय. पाहू या, जेलची क्षमता जास्त आहे की मराठी माणसांची संख्या?" असे म्हणत त्यांनी आंदोलन तीव्र होण्याचे संकेत दिले.

ते पुढे म्हणाले, "व्यापाऱ्यांचा मोर्चा मीरा रोडवर काढू दिला, पण आम्हाला घोडबंदर रोडवर मोर्चा काढण्यास सांगितले. याचा अर्थ स्पष्ट आहे – पोलिसांना आमच्या मोर्चाला परवानगी द्यायचीच नव्हती."

सरकारवर घरचा आहेर

प्रताप सरनाईकांनी स्पष्टपणे सरकारला सुनावले की, “मराठी कार्यकर्त्यांवर तडीपारीच्या नोटिसा देऊन, मोर्चा थांबवून, आम्हाला गप्प करता येणार नाही. पोलिसांची कारवाई म्हणजे फक्त दबावाचे राजकारण आहे. ही दडपशाही सहन केली जाणार नाही.”या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदरमध्ये मराठी अस्मिता, भाषिक संघर्ष, पोलिसी कारवाई आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यांचा कलगजर रंगला असून पुढील काही दिवसांत हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

 

अविनाश जाधवांना मध्यरात्री घेतले ताब्यात 

मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारत कडक प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले. त्यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. याशिवाय पक्षातील पदाधिकाऱ्यांची देखील धरपकड पोलिसांकडून करण्यात आली.

पोलिसांनी यापूर्वीच मनसे व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अविनाश जाधव यांनी मराठी जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करत, कोणत्याही दबावास झुकणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे पोलिसांनी पहाटेच त्यांच्यावर कारवाई केली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!