
Cylone Shakti : अरबी समुद्रात निर्माण झालेलं "शक्ती" चक्रीवादळ महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस, वादळासह समुद्रात उंच लाटा निर्माण होणार असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्य प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत.
अरबी समुद्रात निर्माण झालेलं "शक्ती" हे हंगामातील पहिलं चक्रीवादळ शुक्रवारी तीव्र झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी हे अधिक तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकतं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं की ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर किनारपट्टीवरील समुद्राची स्थिती अत्यंत धोकादायक राहणार असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. जे समुद्रात आहेत त्यांनी तातडीने किनाऱ्यावर परतण्यास सांगितलं आहे.
चक्रीवादळाचा फटका फक्त किनारपट्टीपुरता मर्यादित न राहता विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांनाही बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून उत्तर कोकणात सखल भागांमध्ये पूरस्थिती उद्भवू शकते, असा अंदाज वर्तवला आहे.
चक्रीवादळाचा धोका पाहता राज्य सरकारने आपत्कालीन योजना कार्यान्वित केली आहे. किनारपट्टीवरील आणि पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या स्थलांतराची तयारी, निवारा केंद्रं आणि वैद्यकीय सुविधा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच पोलीस, अग्निशमन दल आणि NDRF यांच्यासोबत समन्वय ठेवण्याचं निर्देश जिल्हा प्रशासनांना देण्यात आले आहेत.