
Pune : शहरातील गरवारे ब्रिजवर महत्त्वाची दुरुस्तीची कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज दुपारी १ ते ४ या वेळेत फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवली जाणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.
वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, जंगली महाराज रोडने येणारी आणि गरवारे ब्रिजमार्गे गुडलक चौकाकडे जाणारी वाहतूक या काळात बंद ठेवली जाईल. या वाहनांनी थेट खंडोजी बाबा चौकातून पुढे जात इच्छित स्थळी जावे, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
खंडोजी बाबा चौकातून फर्ग्युसन कॉलेज रोडकडे जाणारी वाहतूकही बंद राहणार आहे. त्यामुळे अशा वाहनांनी डावीकडे वळून प्रभात रोडने इच्छित स्थळी जावे. याशिवाय, जंगली महाराज रोडवरील झाशीराणी चौकातून खंडोजी बाबा चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. नागरिकांनी गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी दाखवून दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पुण्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती, पूल व ब्रिजवरील देखभाल कामे सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर तात्पुरत्या मर्यादा येत आहेत. नागरिकांनी संयम बाळगावा, नियमांचे पालन करावे आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार मार्गक्रमण करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.