
लाडकी बहीण योजनेबाबत रोजच वेगवेगळे अपडेट समोर येत आहेत. ही योजना कधीच बंद होणार नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या योजनेबाबत बोलताना धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, लाडकी बहीण योजना ही लवकरच बंद केली जाईल. आधीच केवायसी आणि अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या लाडक्या बहिणींची धाकधूक आणखी वाढली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी बोलताना म्हटलं आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होत नाही तोपर्यंत ही योजना सुरु राहील. जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगपालिका निवडणुकांच्या झाल्यानंतर या योजनेचे हप्ते हळूहळू थांबवले जातील. राज्यावरचे कर्ज वाढत चाललं आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोलताना दसरा मेळाव्यात भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत अनेक उलट सुलट अफवा पसरवल्या जात आहेत. ही योजना कधीही बंद होणार नाही, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
आता अविवाहित लाभार्थी महिलेला वडिलांचे आणि विवाहित महिलांना त्यांच्या पतीची केवायसी करावी लागणार आहे. लाभार्थी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान दिवाळीचा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.