Buldhana Crime : हुंडाबळीची धक्कादायक घटना, २० वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Published : Mar 04, 2026, 12:53 PM IST
Gujarat ahmedabad accidental gun death newlywed couple suicide

सार

Buldhana Crime : हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपांमुळे २० वर्षीय रोहिणी म्हस्के हिने २ मार्च २०२६ रोजी आत्महत्या केली. पती आणि सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तिच्या दीड वर्षांच्या मुलावर मातृछत्र हरपल्याची वेळ आली आहे.

Buldhana Crime : हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून सातत्याने होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पतीसह सासू, सासरा आणि दीर अशा चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

हुंड्यासाठी वाढता छळ

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी प्रवीण म्हस्के असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहानंतर सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून पती प्रवीण म्हस्के, सासरे ब्रह्मानंद आनंदा म्हस्के, सासू विमल ब्रह्मानंद म्हस्के आणि दीर प्रदीप ब्रह्मानंद म्हस्के यांनी ‘हुंडा कमी दिला’ या कारणावरून रोहिणीचा छळ सुरू केला, असा आरोप आहे.

याचदरम्यान पतीच्या व्यवसायासाठी चारचाकी वाहन घेण्यासाठी आणखी एक लाख रुपये आणण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. मानसिक तसेच शारीरिक त्रासामुळे रोहिणीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेल्याचे सांगितले जात आहे.

समेटाचा प्रयत्नही निष्फळ

कौटुंबिक वाद मिटावा या हेतूने मुलीच्या माहेरच्यांनी एकदा दहा हजार रुपये दिले होते. मात्र, त्यानंतरही पैशांची मागणी आणि छळ थांबला नाही. अखेर २ मार्च २०२६ रोजी सततच्या त्रासाला कंटाळून रोहिणीने गळफास घेऊन जीवन संपवले.

या प्रकरणी बोराखेडी बुद्रुक येथील रहिवासी परमेश्वर बाबासाहेब मोरे (वय ४२) यांनी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर शिंदे आणि बीट जमादार रविराज चव्हाण करत आहेत.

दीड वर्षांच्या विश्वराजवर दु:खाचा डोंगर

आई रोहिणीच्या आत्महत्येमुळे तिच्या दीड वर्षांच्या विश्वराज या चिमुकल्यावर मातृछत्र हरपण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी सासरच्या लोकांना ताब्यात घेतल्याने घरात लहानग्याची देखभाल कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आईच्या मायेपासून वंचित झालेल्या या निरागस जीवाचे भवितव्य काय, अशी हळहळ व्यक्त होत आहे.

 

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक