
Badlapur : बदलापूर शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना भाजपने स्वीकृत नगरसेवकपद दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे बदलापूरसह राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून भाजपच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तुषार आपटे हे बहुचर्चित बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आहेत. या प्रकरणात शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे मुख्य आरोपी होता, तर शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवर अत्याचार लपवण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. अशा पार्श्वभूमीवर भाजपने तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याचा निर्णय घेतल्याने भाजपवर टीकेची झोड उठली आहे.
कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्या सभेत पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे दोन, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य समाविष्ट आहे. भाजपकडून तुषार आपटे यांची नियुक्ती होताच शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, नगरपालिका निवडणुकीदरम्यान तुषार आपटे यांनी भाजपच्या उमेदवारांना मदत केल्याचे सांगितले जाते. याच कामगिरीच्या बदल्यात त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याचा आरोप होत आहे. मात्र, या निर्णयामुळे भाजपची मोठी कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी रेल रोको आंदोलन करत संपूर्ण बदलापूर शहर बंद ठेवले होते. आंदोलन इतके तीव्र झाले की मंत्री गिरीश महाजन यांनाही आंदोलकांची समजूत काढण्यासाठी मैदानात उतरावे लागले होते.
तपासात अत्याचाराची घटना लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. हे दोघे काही काळ फरार होते. अखेर ठाणे गुन्हे शाखेने त्यांना कर्जत येथील फार्महाऊसमधून अटक केली. सध्या त्यांच्यावर कल्याण सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.
या प्रकरणात अत्याचारापूर्वीच्या 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचे उघड झाले. तसेच काही पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही करण्यात आला. प्रकरण तापल्यानंतरच शाळा प्रशासनाविरोधात गुन्हे दाखल झाले होते.