Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरून राजकारण तापले; शीतल म्हात्रेंच्या ट्विटने नवा वाद पेटला

Published : Mar 26, 2026, 12:15 PM IST
ashok kharat case

सार

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शीतल म्हात्रे यांच्या ट्विटमुळे ठाकरे गटावर निशाणा साधण्यात आला असून, पाणीपुरवठा आणि शस्त्र परवाना यांसारखे मुद्दे चर्चेत आले आहेत.

Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यासह देशभर चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकरणाचे पडसाद आता थेट राजकीय वर्तुळात उमटताना दिसत असून आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. याचदरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

शीतल म्हात्रेंचे ट्विट चर्चेत

शीतल म्हात्रे यांनी एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये खरातला देण्यात आलेल्या पाणी जोडणीवरून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “ही जोडणी ‘मातोश्री’च्या आग्रहाखातर देण्यात आली होती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या गटावर निशाणा साधला. या ट्विटनंतर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

दारणा धरणातून पाणीपुरवठ्यावर वाद

अशोक खरात यांच्या संस्थेसाठी दारणा धरणातून सुमारे 39 लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आल्याचा जीआर समोर आला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेण्यात आल्याची माहिती आहे. धरणापासून सुमारे 48 किमी अंतरावर पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्यात आला होता. हे पाणी पिण्यासाठी दाखवले असले तरी ते आंब्याच्या बागेसाठी वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे.

29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) चौकशी करत असून दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आतापर्यंत त्याच्याविरोधात 10 गुन्हे दाखल झाले आहेत.

शस्त्र परवाना आणि काडतुसे प्रकरणात नवे ट्विस्ट

तपासादरम्यान खरातकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनाने दिल्याचे उघड झाले आहे. 2012 मध्ये परवाना मंजूर झाला होता आणि 2024 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्याच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यापैकी काही वापरलेली असल्याचे समोर आले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला, याचा तपास सुरू आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

भोंदूबाबा अशोक खरातची ‘पंचसूत्री’ उघड; विश्वास जिंकून महिलांना जाळ्यात ओढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; मराठा इतिहास क्षेत्रात शोककळा