
Arjun Tendulkar Wedding : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या घरात लवकरच आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. सचिन तेंडुलकर यांचा लाडका मुलगा अर्जुन तेंडुलकर याचं या वर्षी लग्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या विवाहाची तारीखही आता समोर आली असून, तेंडुलकर कुटुंबात सनईचौघड्यांचे सूर लवकरच घुमणार आहेत.
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा साखरपुडा ऑगस्ट 2025 मध्ये पार पडला होता. हा सोहळा अत्यंत खासगी पद्धतीने जवळचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत झाला. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान सचिन तेंडुलकर यांनी स्वतः या साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. सानिया चंडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे.
टाइम्स ऑफ इंडिया (Bombay Times) ने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाहसोहळा 5 मार्च 2026 रोजी पार पडणार आहे. लग्नापूर्वीचे अन्य धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रम 3 मार्च 2026 पासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. हे सर्व कार्यक्रम मुंबईतच पार पडण्याची शक्यता असून, लग्न सोहळा अत्यंत खासगी स्वरूपाचा असेल.
या विवाहसोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि अत्यंत जवळचे मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत. तेंडुलकर कुटुंबाकडून हा सोहळा साधेपणाने पण थाटात साजरा केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. क्रिकेटविश्वासह चाहत्यांमध्ये या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
सानिया चंडोक ही एक यशस्वी उद्योजिका आहे. तिने London School of Economics येथून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली आहे. पाळीव प्राण्यांविषयी असलेली आवड तिने व्यवसायात रूपांतरित करत ‘Mr. Paws Pet Spa & Store LLP’ ही लक्झरी पेट स्पा कंपनी सुरू केली आहे. तिच्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे 90 लाख रुपये असल्याची माहिती आहे. घई कुटुंब हे हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असून, त्यांचा व्यवसाय इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीशी संबंधित आहे.