
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणानं सगळ्यांना हादरवून सोडलं आहे. अयान अहमद नावाच्या १९ वर्षांच्या आरोपीवर अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी सांगितलं की, ११ एप्रिल रोजी अल्पवयीन मुलींच्या काही धक्कादायक क्लिप्स ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर लगेचच सखोल तपास सुरू झाला आणि १३ एप्रिलला अयान अहमदला अटक करण्यात आली.
इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक झाली आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हे प्रकरण दिसतंय त्यापेक्षा खूप मोठं असू शकतं.
ऑनलाइन व्हायरल झालेल्या अनेक क्लिप्समध्ये अहमद एकदम दिखाऊ जीवनशैली जगत असल्याचं दिसतं. एका व्हिडिओमध्ये तो महिंद्रा थार एसयूव्ही चालवताना दिसतो. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्या हातात आयफोनसारख्या महागड्या स्मार्टफोनचा गठ्ठा आहे.
काही क्लिप्समध्ये तो पैशांचे मोठे बंडल दाखवत आहे. एका व्हिडिओमध्ये तर तो चक्क बंदूक घेऊन उभा असल्याचं दिसतं.
एका क्लिपमध्ये तो म्हणतो की, 'जिंकणं माझ्यासाठी आयुष्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे'. यावरून तो सोशल मीडियावर आपली एक दबंग आणि आक्रमक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत होता, असं दिसतं.
या पोस्ट खरंच त्याच्या आयुष्याचा भाग होत्या की फक्त दिखाव्यासाठी होत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसणारी एसयूव्ही हा तपासातील एक महत्त्वाचा धागा आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, पोलीस MH-27-DL-3100 या नोंदणी क्रमांकाच्या महिंद्रा थारच्या मालकीची पडताळणी करत आहेत.
ही गाडी अहमदची होती की या प्रकरणाशी संबंधित दुसऱ्या कोणाची, हे पोलीस शोधत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या शस्त्राचाही तपास सुरू आहे. ते शस्त्र कायदेशीररित्या बाळगले होते की बेकायदेशीरपणे वापरले जात होते, हे अधिकारी तपासत आहेत.
या तपशिलांमुळे आरोपीकडे बेकायदेशीर संसाधने किंवा संपर्क होते का, हे समजण्यास पोलिसांना मदत होऊ शकते.
तपास अधिकाऱ्यांनी अमरावतीच्या कटोरा नाका भागातील एक फ्लॅट या प्रकरणातील महत्त्वाचं ठिकाण म्हणून ओळखलं आहे.
हे अपार्टमेंट एका निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी याच फ्लॅटचा वापर झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
स्थानिक रहिवाशांनी या फ्लॅटमध्ये संशयास्पद हालचाली होत असल्याचं सांगितलं आहे. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तरुण मुलं-मुली अनेकदा रात्री उशिरा या फ्लॅटवर येत असत.
काही रहिवाशांनी सांगितलं की, येणारे-जाणारे आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करायचे. हा सर्व तपशील आता तपासाचा भाग आहे.
या प्रकरणात पीडितांची नेमकी संख्या किती आहे, याची अजूनही पडताळणी सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत केवळ मर्यादित संख्येनेच पीडितांची ओळख पटवली आहे.
मात्र, स्थानिक दाव्यानुसार, आणखी अनेक मुलींना लक्ष्य केले गेले असावे. काही रिपोर्ट्समध्ये शेकडो व्हिडिओ अस्तित्वात असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, तपास अधिकारी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळत आहेत.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) यांसारख्या अनेक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे कायदे अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर डिजिटल कंटेंट शेअर करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आहेत.
हे प्रकरण हाताळण्यासाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.
पोलिसांनी तपासादरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत. यामध्ये मोबाईल फोन, एक लॅपटॉप, एक टॅबलेट आणि एक हार्ड डिस्क यांचा समावेश आहे.
ही सर्व उपकरणं फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आली आहेत. तज्ज्ञ यातून व्हिडिओ, मेसेज आणि इतर डिजिटल पुरावे शोधतील.
पोलिसांच्या माहितीनुसार, अहमदने हे व्हिडिओ त्याच्या एका साथीदाराला शेअर केले, ज्याने ते पुढे प्रसारित केले. यामुळे तपास अधिकाऱ्यांना आणखी संशयित ओळखण्यास मदत झाली. आतापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, कोणत्याही परिस्थितीत पीडितांची ओळख उघड करू नये.
त्यांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुढे येऊन सुरक्षित आणि गोपनीय पद्धतीने माहिती देण्यास सांगितलं आहे. महिला अधिकाऱ्यांमार्फत जबाब नोंदवण्याची व्यवस्था पोलिसांनी केली आहे. ओळख गुप्त ठेवण्यासाठी सर्व तपशील सीलबंद ठेवला जाईल, असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
आता पोलिसांचा मुख्य भर अहमदच्या आर्थिक स्रोतांचा माग काढण्यावर आहे. त्याला ही आलिशान जीवनशैली जगण्यासाठी पैसा कुठून मिळत होता आणि यात आणखी कोण सामील होतं, हे तपास अधिकारी शोधत आहेत.
त्याचे संभाव्य साथीदार ओळखण्यासाठी पोलीस त्याच्या मित्र-परिवाराची आणि संपर्कांचीही तपासणी करत आहेत. तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे आणखी धागेदोरे समोर येतील, असा अधिकाऱ्यांना संशय आहे.
सध्या तरी पीडितांना संरक्षण देणे, भक्कम पुरावे गोळा करणे आणि सर्व जबाबदार व्यक्तींना कायद्याच्या चौकटीत आणणे याला पोलिसांचे प्राधान्य आहे.