
पुणे: पुण्यात सलग पडत असलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. त्यातच मेट्रोच्या कामातून उरलेला मलबा आणि रस्त्यांवर अडथळे यामुळे वाहतुकीचा अक्षरशः पार बोजवारा उडालाय. त्यामुळे संतप्त होत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी थेट मेट्रो अधिकाऱ्यांना दोन दिवसांची अल्टिमेटम दिली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत अजित पवार यांनी हिंजवडी-टाटा मेट्रो कॉरिडॉरवर ठिकठिकाणी पडलेला मलबा आणि अडथळ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “जर सोमवारपर्यंत सर्व मलबा आणि अडथळे हटवले नाहीत, तर PMRDA वर ₹10 कोटींचा दंड ठोठावण्यात येईल,” असा ठणकावलेला इशाराच त्यांनी दिला.
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मेट्रोच्या कामातून तयार झालेला मलबा चिखलात रूपांतरित झाला आहे. त्यामुळे रस्त्यांवरून जाणं कठीण झालं आहे. IT क्षेत्रातील कर्मचारी, हिंजवडीमार्गे प्रवास करणारे नागरिक, तसेच पाळखी मार्गावरून जाणारे वारकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. काहीजण तर एकाच ठिकाणी तासन्तास अडकून पडले.
बैठकीत उपस्थित वाहतूक पोलिस आणि मेट्रो प्रतिनिधींना सुनावत अजित पवार म्हणाले, “मेट्रो प्रकल्प शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, पण तो सामान्य नागरिकांच्या त्रासाच्या किंमतीवर नको.”
स्थानीय रहिवाशांनीही यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “रोज मेट्रोच्या मलब्यामधून आणि पावसाच्या पाण्यातून गाडी काढावी लागते. चिखल, खड्डे, आणि वाहतूक कोंडी यामुळे वेळ आणि मानसिक त्रास दोन्ही होतं,” असं एका स्थानिक नागरिकाने सांगितलं.
अजित पवारांच्या स्पष्ट निर्देशांनंतर आता प्रशासनानेही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुढील दोन दिवसात परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर PMRDA ला आर्थिक दंड भोगावा लागणार आहे.
पुण्यातील वाहतुकीची सध्याची परिस्थिती भीषण बनली असून, पालकमंत्र्यांनी आता कंबर कसली आहे. येणाऱ्या दोन दिवसांत प्रशासन आणि मेट्रो यंत्रणा कितपत सक्रिय होतात, यावर पुणेकरांच्या रोजच्या जीवनात काहीसा दिलासा मिळेल की नाही, हे स्पष्ट होईल.