
मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा बेफाम वेगाने जाणाऱ्या वाहनाने मृत्यूचा कहर घडवला आहे. गोवंडी परिसरातील शिवाजीनगर भागात एका भरधाव डंपरने तिघांना चिरडल्याची भीषण घटना घडली. या अपघातात तिन्ही नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत तीव्र आंदोलन केलं. जवळपास अडीच तास तणावपूर्ण वातावरण राहिल्यानंतर अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करून गर्दी हटवावी लागली.
शिवाजीनगरमधील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर हा अपघात घडला. डंपरच्या जोरदार धडकेत तिघे नागरिक अक्षरशः चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला. काहींनी डंपर चालकाला पकडून धोपटल्याचंही समोर आलं आहे. पोलिसांनी तातडीने चालकाला जमावाच्या तावडीतून वाचवत ताब्यात घेतलं.
अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनी ठिय्या मांडून जोरदार आंदोलन केलं. "दरवेळी मरण आमचंच का?" असा प्रश्न आंदोलक विचारत होते. या रस्त्यावर वारंवार अपघात होत असून, अनधिकृत पार्किंग, रस्त्यांची अवस्था आणि वाहतुकीचा अभाव यामुळे जीवघेणी दुर्घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. मुंबई आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या जमावाने ऐकण्यास नकार दिला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली असून, घटनेची अधिक चौकशी सुरू आहे. अपघातग्रस्त ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
घटनास्थळाजवळ वारंवार अपघात होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्त्यावर अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक, आणि प्रशासनाचा दुर्लक्ष यामुळे अशा घटना घडतात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. आता प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जातात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अहमदाबाद विमान अपघात, मुंब्र्याची लोकल दुर्घटना आणि आता गोवंडीतील डंपरचा थैमान अशा घटनांमुळे एकच प्रश्न पुन्हा समोर येतो : "मरण इतकं स्वस्त झालंय का?" प्रशासन, राजकारणी आणि वाहतूक व्यवस्थेकडून ठोस पावलं उचलली जातील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.