
अमरावती: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनवाढीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन अखेर सातव्या दिवशी स्थगित करण्यात आलं आहे. मात्र, आंदोलन संपलेलं नाही, तर ते "पुढे ढकललं आहे," असं स्पष्ट करत त्यांनी सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतची अल्टिमेटम दिली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला.
मंत्री उदय सामंत यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर बच्चू कडूंनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण याआधी कडू यांनी सामंतांना जाहीर इशाराच दिला. “उदयजी, जर तुम्ही विश्वासघात केला, तर पुढचं आंदोलन तुमच्या घराबाहेर करणार!” अशी दमदार घोषणा करत बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला. मात्र त्यानंतर शांत होत पाणी प्यायले आणि उपोषण थांबवले.
बच्चू कडूंनी काल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यांनी कडू यांच्या मागण्या मंत्रिमंडळाच्या पटलावर मांडण्यात येतील, अशी हमी दिली होती. हेच आश्वासन लेखी स्वरूपात उदय सामंत यांनी आज बच्चू कडूंना दिलं. त्यानंतरच उपोषण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अमरण उपोषणाच्या सातव्या दिवशी बच्चू कडूंच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला होता. यावेळी त्यांची पत्नी नयना कडू भावनिक झाल्या होत्या. शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढणाऱ्या बच्चू कडूंना आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार पाठिंबा दिला होता.
उद्या (15 जून) प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे पुकारण्यात आलेले राज्यभरातील रास्ता रोको आंदोलनही मागे घेण्यात आले आहे. कडूंनी स्पष्ट केले की, “आता कुणीही रस्त्यावर उतरू नये. सरकारला दिलेली मुदत पूर्ण होईपर्यंत संयम बाळगावा.”
कडूंनी हे आंदोलन मागे घेतले असले तरी त्यांनी सरकारसमोर वेळेची चौकटही ठेवली आहे. “आमच्या मागण्यांवर जर 2 ऑक्टोबरपर्यंत ठोस निर्णय झाला नाही, तर या आंदोलनाची पुढील फेरी अधिक तीव्र आणि परिणामकारक असेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
बच्चू कडूंनी आंदोलन स्थगित करून सरकारला संधी दिली असली, तरी त्यांनी स्पष्ट केलं की संघर्ष अजून संपलेला नाही. शेतकरी, दिव्यांग आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी ही लढाई आहे आणि ती शेवटपर्यंत सुरूच राहील.