
पुणे | प्रतिनिधी पुण्यातील अंबेगाव बुद्रुक परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ५९ वर्षीय इसमाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करताना, समोर लावलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पोस्टरवरच मूत्रविसर्जन केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, या कृतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, संबंधित इसमाला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. पण प्रश्न असा निर्माण होतो की – ही कृती निष्कळजी होती, की जाणीवपूर्वक केलेला ऐतिहासिक अस्मितेचा अपमान हेच अजून समजलेलं नाही.
‘शिवसृष्टी’ हे केवळ एक स्मारक नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी गर्वाचं प्रतीक आहे. अशा ठिकाणी अश्लाघ्य वर्तन करणं म्हणजे संपूर्ण इतिहास आणि शिवप्रेमींना अवहेलनेचा ठपका लावणं, असा सूर नागरिकांतून उमटत आहे.
पोलीस यंत्रणा सजग, पण कायदेशीर पावलं पुरेशी आहेत का? पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आरोपीला ताब्यात घेतलं असलं, तरी याप्रकारावर कोणती कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. केवळ ‘सार्वजनिक ठिकाणी लघुशंका’ अशा सौम्य आरोपाखाली प्रकरण थांबवण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या घटनेनंतर परिसरातील शिवप्रेमींनी आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत, शिवसृष्टी परिसरात कायमस्वरूपी सुरक्षेची मागणी केली आहे. काहींनी तर या घटनेचा ‘पूर्वनियोजित अपप्रचार’ असल्याचा संशयही व्यक्त केला आहे.