डोंबिवली: आई रागवल्यामुळे एका १५ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. अभ्यासाकडे लक्ष दे, मोबाईल जास्त खेळू नको, असे आईने सांगितल्याने दुखावलेल्या मुलीने डोंबिवलीतील माणकोली पुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्या केली. दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह रविवारी सायंकाळी खाडीजवळ आढळून आल्याने या घटनेची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर परिसरात आई-वडिलांसोबत राहत होती. मुलीचे वडील भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी 5 डिसेंबर रोजी दुपारी ही मुलगी सतत मोबाईल फोन वापरत होती. यावेळी तिच्या आईने मुलीला मोबाईल फोन न वापरता अभ्यासावर लक्ष दे असे सांगितले. आईच्या बोलण्याचं मुलीला इतकं वाईट वाटलं की ती काहीही न सांगता घरातून निघून गेली. मुलगी आपल्या मैत्रिणीकडे गेली असावी, असे प्रथम कुटुंबीयांना वाटले. मात्र, दुपारी गेलेली मुलगी सायंकाळ होऊनही घरी न परतल्याने तिचा शोध सुरू झाला. मात्र मुलगी कुठेच सापडली नाही. मुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान, मोठागाव-माणकोली पुलावरून एका मुलीने उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी खाडीतील बोटीच्या माध्यमातून तरुणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती सापडली नाही. दरम्यान, रविवारी सायंकाळी मोठागाव खाडीच्या काठावर मुलीचा मृतदेह वाहून आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मुलीच्या पालकांनाही बोलावण्यात आले. पालकांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
आणखी वाचा-