Prabhu Shri Ram Upasana : प्रभू श्री राम या नामाचे रहस्य व उपासनेचे महत्त्व, जाणून घ्या सविस्तर

Prabhu Shri Ram Upasana : प्रभू श्री राम या नामाचे रहस्य तुम्हाला माहिती आहे का? कोणत्या बीजमंत्रापासून निर्माण झाले आहे हे नाम? जाणून घ्या सविस्तर माहिती…

Harshada Shirsekar | Published : Jan 18, 2024 10:15 AM IST / Updated: Jan 18 2024, 04:01 PM IST

- डॉ. विश्राम वि कुंटे

Prabhu Shri Ram Upasana : प्रभू श्री राम यांच्या उपासनेचे रहस्य त्यांच्या नामातच दडलेले आहे. 'र' अक्षर 'रं' या बीजमंत्रापासून निर्माण झालेले आहे. ‘रं’ हा बीजमंत्र अग्नितत्त्वाचा आहे, असे मंत्रशास्त्र सांगते. पंचमहाभूतातील तिसरे महाभूत अग्नि; अग्नि, तेज किंवा प्रकाशतत्त्व. प्राण्यांना पाहण्याची शक्ती अग्नि देते, त्यास ‘स्पर्श’ आणि 'रूप' आहे. अग्निमध्ये सकारात्मक गोष्टी दाखवण्याची शक्ती आहे, या तत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहेत 'डोळे'.

अग्नि म्हणजे जीवनाचे, जिवंतपणाचे, चैतन्याचे, ऊर्जेचे लक्षण आहे. शरीरातून अग्नि निघून गेला की ते थंड पडते. या थंड पडलेल्या शरीराला मृतदेह म्हणतात. त्यात काही राम नाही असे म्हटले जाते.

कलियुगात नामस्मरण उपासना श्रेष्ठ आणि त्वरीत फळ देणारी सांगितली आहे. श्री रामाच्या कुठल्याही मंत्राचा जप करताना 'रं' हे अग्निबीज आपोआप उच्चारले जाते आणि त्याचा परिणाम स्वरुप शरीरातील अग्नि चेतवला जातो. या अग्निमुळे स्नायू दौर्बल्य नष्ट होते. त्वचारोग बरे होतात, हाडे सशक्त होतात. शरीरांतर्गत ग्रंथींच्या स्त्रावांमध्ये संतुलन निर्माण होते. 'रं' च्या सतत जपामुळे हे फायदे निश्चित होतात.

षटचक्रात मणिपूर चक्राचे स्थान शरीराच्या नाभीच्या मागे आहे, असे म्हटले जाते. त्या चक्राचा बीजमंत्र ‘रं’ आहे. त्याची रचना तिथेच का? हे आता उलगडत आहे. नाभी / नाळ आईशी जोडलेली असते, ज्यातून त्या जीवाच्या शरीराचे पोषण होत असते. तिथेच ‘रं’ बीज असावे, हा निसर्ग शक्तीचा चमत्कार म्हटले पाहिजे. ‘रं’ बीज म्हणून संरक्षणाचे ही काम करते.

स्वाभाविकच जठर/पोटाच्या भागाच्या इथे अग्नितत्त्वाचा प्रभाव जास्त आहे. पचनक्रियेला/अन्नाचे प्रज्वलन करायला लागणारा अग्नि शरीराला त्या खेरीज मिळणार नाही. अग्नितत्त्वाच्या न्युनतेमुळे जंतूसंसर्ग लवकर होतो. याची प्रचिती आपण नुकतीच कोव्हिड संसर्गाच्या आजाराद्वारे घेतली.

व्हिटॅमिन D, सूर्यकिरण आणि अग्नितत्त्व यांचा नक्की घनिष्ठ संबंध असलाच पाहिजे. याची ही अनुभूती आता शास्त्रज्ञांच्या लक्ष्यात येत आहे. ‘रां’ म्हणजे धगधगता अग्निच, रामाचा जन्म देखील भर दुपारी 12 वाजता सूर्य माथ्यावर पूर्ण अग्निसामर्थ्यांने तळपत असताना झालेला आहे. ‘रां’मध्ये पापसंस्कार, रोगबीजे, वाईट संस्कार, दोष जाळून टाकण्याची क्षमता आहे. केवळ ‘रां’ चा जप करून वाल्या कोळाचे रुपांतर वाल्मिकी ऋषींमध्ये झाले, असा रामायणात उल्लेख आहे.

मृत्यूसमयी ‘रां’ या मंत्राचा जप करत राहिल्यास सर्व पाप नष्ट होऊन मुक्ती मिळते, असे पुराणात सांगितले आहे. मृत्यूनंतर देखील स्मशानात नेताना इतर कुठल्याही देवी-देवतांचा जप न करता फक्त ‘रां’ या मंत्राचाच जप का केला जातो, याचे कारण हेच आहे.

आपले ऋषीमुनी शास्त्रज्ञच होते, यात शंका असण्याचे काही कारण नाही. अग्निचे हे आरोग्यवर्धक/ संरक्षक महत्त्व ओळखून ‘रां’ या बिजाचा उपयोग करून जप मंत्राची निर्मिती केली असावी. असा हा 'राम मंत्र' रामाच्या उपासनेतूनच व्यक्त होतो आणि हा रामरूपी अग्नि अंधारातून प्रकाशाकडे चैतन्याकडे जाण्याची वाट दाखवतो.

रामरक्षा स्तोत्र

रामरक्षा स्तोत्रात ‘रां’ या बीजाची प्रचंड महती दिली आहेच. ‘रां’ हा सुखसंपत्ती देतो, यमदुताना पळवतो. राम हा अग्नि अंधारात जन्म घेणाऱ्या तामसी शक्तींना नष्ट करून, जीवाचे कल्याण करतो. नाम जपामुळे ‘रां’ ‘रां’ ची स्पंदने आपल्या भोवती निर्माण होऊन आपल्या भोवतालच्या तामसी शक्ती अशुद्ध वातावरणाचा नायनाट करतात.

उपासना कशी करावी?

उपासना कशी करावी हा प्रश्न विचारणे म्हणजे मी पेढा कुठल्या बाजूने खाऊ म्हणजे गोड लागेल, असे विचारण्यासारखे आहे. जसा पेढा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी गोडच, तसेच नामस्मरणाचे आहे.

कलियुगात सगुण उपासना आणि 'नामस्मरण' चटकन फलदायी होईल, असे भगवान सांगून गेलेत. नामस्मरण सतत श्रद्धापूर्वक भक्तिपूर्वक घेत गेल्यास नक्कीच इप्सित फलप्राप्ती होईल. असे म्हणतात वाल्या कोळ्याने 'मरा मरा' जप केला. परंतु जपाचा योग्य परिणाम होऊन वाल्याचा वाल्मिकी झाला.

श्रीरामाच्या चरित्राचा वेध घेतला असता, त्याने त्याने शत्रू /मित्राच्या घरात चैतन्याचा दिवा लावून प्रत्येकाचे पुनर्वसनच केले. त्याप्रमाणे प्रत्येक जीवाने श्रीरामाचे नामसंकीर्तन भक्ती करून आपले आपण पुनर्वसन करून घ्यावे हे निश्चित.

|| श्रीराम समर्थ ||

DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

Ram Mandir Ayodhya : श्री रामाचे हे 11 मंत्र करू शकतात प्रत्येक दुःख दूर, 22 जानेवारीला करा जप

Ayodhya Ram Mandir सोन्यासारखे चमकेल श्री राम मंदिर, नवीन फोटो पाहिले?

VIDEO : पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित 6 स्मारक टपाल तिकिटे केली प्रसिद्ध

Share this article