मुंबई : मासिक पाळी कायमची बंद होणे म्हणजेच मेनोपॉज. पण मेनोपॉजनंतरही जर अचानक योनीतून रक्तस्राव (Vaginal bleeding) सुरू झाला, तर ते सामान्य नाही. अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. शेवटची पाळी येऊन १२ महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटल्यानंतरही ब्लीडिंग किंवा स्पॉटिंग होत असेल, तर त्याला पोस्ट-मेनोपॉजल ब्लीडिंग (PMB) म्हणतात. हे गर्भाशयाच्या अस्तराच्या कॅन्सरचे म्हणजेच एंडोमेट्रियल कॅन्सरचे (Endometrial cancer) प्रमुख लक्षण असू शकते.
महिलांमध्ये आढळणाऱ्या गायनॅकॉलॉजिकल कॅन्सरपैकी एंडोमेट्रियल कॅन्सर सर्वात सामान्य आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मेनोपॉजनंतर होणाऱ्या ब्लीडिंगमुळे या कॅन्सरचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यात होऊ शकते. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे, विशेषतः प्रोजेस्टेरॉनशिवाय इस्ट्रोजेनची पातळी वाढल्यास गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) असामान्यपणे वाढते. या असंतुलनामुळे पेशींची अनियंत्रित वाढ होते आणि त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकते. मेनोपॉजनंतर ब्लीडिंग होणाऱ्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे १० टक्के प्रकरणांमध्ये एंडोमेट्रियल कॅन्सरचे निदान होते.
खालील कारणांमुळे एंडोमेट्रियल कॅन्सरचा धोका वाढू शकतो :
मेनोपॉजनंतर अचानक ब्लीडिंग किंवा स्पॉटिंग होणे, हे या कॅन्सरचे सर्वात मुख्य आणि अनेकदा एकमेव लक्षण असते. अगदी फिकट गुलाबी रंगाचा स्राव जरी होत असेल, तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. याशिवाय ओटीपोटात दुखणे, लघवी करताना किंवा शारीरिक संबंध ठेवताना त्रास होणे, ही देखील याची काही लक्षणे असू शकतात.
तुम्ही गायनॅकॉलॉजिस्टकडे गेल्यास, डॉक्टर सर्वात आधी पेल्विक एक्झाम आणि ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड करतात. गर्भाशयाच्या अस्तराची जाडी तपासण्यासाठी MRI, CT आणि PET CT सारख्या इमेजिंग टेस्टही केल्या जातात. जर अस्तर जाड झालेले आढळले, तर कॅन्सरचे निदान करण्यासाठी 'एंडोमेट्रियल बायोप्सी' केली जाते. यातून कॅन्सर आहे की नाही, हे स्पष्ट होते.
या कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास, योग्य उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक असते. बहुतांश रुग्णांमध्ये 'हिस्टेरेक्टॉमी' (Hysterectomy) ही शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये डॉक्टर शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय काढून टाकतात, जेणेकरून कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात. जर कॅन्सर आजूबाजूच्या अवयवांमध्ये पसरला असेल, तर अंडाशय (Ovaries) आणि फॅलोपियन ट्यूब्सही काढाव्या लागतात. यानंतर उरलेल्या कॅन्सर पेशी नष्ट करण्यासाठी रेडिएशन थेरपी, केमोथेरपी किंवा हार्मोन थेरपी दिली जाऊ शकते.
थोडक्यात सांगायचे तर, मेनोपॉजनंतर थोडे जरी ब्लीडिंग होत असेल, तर ते वाढत्या वयाचे लक्षण समजून अंगावर काढू नका. योग्य वेळी गायनॅकॉलॉजिस्टचा सल्ला घेतल्यास संभाव्य धोका टाळता येतो. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
- हा लेख मणिपाल हॉस्पिटल व्हाईटफिल्डच्या कन्सल्टंट - ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी, डॉ. तस्नीम निशा शाह यांनी लिहिला आहे.