Mahashivratri 2025 : भगवान शंकराला पूजेवेळी बेलपत्र का वाहतात?

येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. यावेळी भगवान शंकराची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. यावेळी भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलपत्र का वाहतात हे माहितेय का?

Mahashivratri 2025 : पौराणिक कथांमध्ये बिल्वपत्राची कथा आढळून येते. यानुसार, समुद्र मंथनावेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले. या विषामुळे भूमीवरील जीव-जंतूंचा मृत्यू होऊ लागला. यामुळे पृथ्वीवर मोठे संकट निर्माण झाले. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले विष शंकराने प्राशन केले. यामुळे त्यांचा कंठ नीळा पडला. यावरून शंकराला नीळकंठ नावाने ओळखले जाऊ लागले. मात्र, विषाच्या प्रभावामुळे शंकराचे डोके अत्यंत गरम झाले. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली.

शंकराची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला सरसावले. त्यांच्या डोक्यावर बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने ठेवून, शंकरावर पाण्याचा अभिषेक केला. यामुळे शंकराचे डोके शांत झाले. बेलाची पाने थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच शिवपूजनावेळी बेलाच्या पानाचा सर्वाधिक वापर केला जातो.

पुराणात बेलपत्राविषयी एक कथा आहे की, माता पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, कठोर तपश्चर्या केली. त्यांनी अनेक प्रकारचे उपवास केले. एकदा महादेव जंगलात बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असताना देवी पार्वती शिवाची पूजा करण्यासाठी पूजेचे साहित्य आणायला विसरल्या. मग त्यांनी झाडाच्या गळून पडलेल्या पानांनीच शिवाची आराधना सुरू केली आणि देवाला पानांनी पूर्णपणे झाकून टाकले. यावर भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून त्यांना बेलाची पाने वाहिली जातात.

हेही वाचा : 

लक्ष्मी प्रेरित मुलींची नावे: देवीसमान लेकीसाठी

यंदाच्या महाशिवरात्रीला द्या भीमाशंकर मंदिराला भेट, वाचा कसे पोहोचाल

महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो. माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीला शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. मानले जाते की, या दिवशी उपवास केल्याने आणि आपल्या आवडत्या वस्तू भगवान शंकराला अर्पण केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात. बेलपत्र हा महादेवाची सर्वात आवडती गोष्ट मानली जाते. असे म्हणतात की, देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकराची बेलाच्या पानांनी पूजा केली होती, म्हणूनच बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहेत.

आध्यात्मिक साहित्यात अशी मान्यता आहे की, बेलाची पाने शिवाला अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळते. शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत, त्या सर्वांचे मूळ बिल्व पत्रात असल्याची मान्यता आहे. शिवपूजनात बिल्व पत्राचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? घ्या जाणून

Share this article