36 गुण जुळले पण आरोग्याचे काय? लग्न करण्याआधी दोघांनी कराव्या या टेस्ट

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे अनेकांची लग्न जुळता आहेत तर अनेक जण लग्न बंधनात अडकले आहेत. मात्र या सगळ्यात ३६ गुण जुळले असले तरी आरोग्याचे गुण जुळायला हवे त्यासाठी या टेस्ट आवश्यक आहेत.

Ankita Kothare | Published : Mar 18, 2024 1:13 PM IST / Updated: Mar 18 2024, 06:47 PM IST

लाईफस्टाईल डेस्क : लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा आहे. लग्न जमवताना दोघांची कौटुंबिक स्थिती, उत्पन्न व सौंदर्य अशा गोष्टी विचारात घेतात. ३६ पैकी मुलाचे आणि मुलीचे किती गुण जुळतात याचा देखील विचार केला जातो मात्र कुंडली प्रमाणे एकमेकांचे आरोग्य देखील जुळते का? याचा विचार कोणी करत नाही. पण हल्ली अनेकजण या टेस्ट करत असून याचे प्रमाण देखील खूप कमी आहे.

आतापर्यंत लग्न जाण्यापूर्वी जोडप्यांची एचआयव्ही एड्सची चाचणी करावी,असा सल्ला दिला जायचा आणि अनेकजण करत हि आहे. पण, त्यासह अशा काही आरोग्य चाचण्या आहेत की, ज्या तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी जोडप्याने कोणत्या आरोग्य चाचण्या कराव्यात हे जाणून घेऊया.

रक्तगट:

लग्न करण्यापूर्वी दोघांचा रक्तगट कोणता आहे हे माहित असणे आवश्यक आहे. तसेच काही आजार स्त्री-पुरुष संबंधांतून पसरतात,यामध्ये एचआयव्ही एड्स, हेपॅटायटिस बी, ई, सी, इतर गुप्तरोग या आजारांची तपासणी करणे.

सिकल सेल:

देशातील अनेक दुर्गम भागात सिकल सेल अॅनिमियाचे रुग्ण आढळून येतात. पत्नी आणि पतीला सिकल सेल अॅनिमियाची लागण झाली असेल, किंवा जर ते या आजाराने ग्रासले असतील तर त्यांच्या होणाऱ्या बाळालाही तो होण्याची शक्यता अधिक वाढते. सिकल सेल प्रभावित क्षेत्रातील लग्न करणाऱ्या जोडप्यांनीही सिकल सेल अॅनिमियाची चाचणी करून घेणे आवश्यक आहे.

डाऊन सिंड्रोम:

आजकाल लग्नाचे वय वाढत आहे. त्यामुळे बाळ होतानाचे आईचे आणि वडिलांचे वय ३५ च्या पुढे असेल, तर विविध आजारांचा धोका वाढतो. लग्न खूप उशिरा झाले, तर अनेकदा बाळाला आनुवंशिक आजार होण्याचा धोका अधिक असतो किंवा स्मरणशक्ती आणि बुद्धीमत्तेने कमजोर असलेले बाळ जन्माला येण्याची दाट शक्यता असते.

युरिन टेस्ट:

युरिन टेस्टच्या माध्यमातून दोघांना काही याविषयीचा संसर्ग आहे का ते समजते. स्त्री-पुरुष संबंधांच्या अनुषंगाने हा महत्त्वाचा मुद्दा आहे; पण युरिनसंबंधित काही आजार असेल तरी तो आठवडाभराच्या औषधोपचाराने बरा होऊ शकतो.

जेनेटिक डिसीज टेस्ट:

लग्न करण्यापूर्वी वधू-वराने जेनेटिक डिसीज टेस्ट करून घेतली पाहिजे. कारण- दोघांपैकी एकाला कोणताही आनुवंशिक आजार असल्यास तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होऊ शकतो. आनुवंशिक आजारांमध्ये मधुमेह, किडनीचे आजार, कर्करोग यांसारख्या आजारांचा समावेश आहे. त्यामुळे पती-पत्नी यापैकी कोणाला एखादा आजार असेल, तर मूल जन्माला घालण्याचा विचार करताना आवश्यक ती काळजी घेता येऊ शकते.

इन्फर्टिलिटी टेस्ट:

मूल जन्माला घालण्यात व्यक्ती किती सक्षम आहे हे इन्फर्टिलिटी टेस्टद्वारेच कळू शकते. कारण- या आजारासंबंधीची लक्षणे डोळ्यांनी दिसत नाहीत. या चाचणीद्वारे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि महिलांच्या अंडाशयाचे आरोग्य तपासले जाऊ शकते. त्यामुळे बाळाचे नियोजन आणि चांगले शारीरिक संबंध राखण्यास मदत होते.

सेक्शुअली ट्रान्स्मिटेड डिजीज टेस्ट:

उशिरा लग्न करण्याच्या वाढत्या ट्रेंडमुळे लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रमाण वाढताना दिसतेय. हल्ली ही एक सामान्य गोष्ट झाली आहे; परंतु त्यासोबतच लैंगिक आजारांचा धोकाही खूप वाढला आहे. अशा रोगांमध्ये एचआयव्ही एड्स, गोनोरिया, नागीण, सिफिलीस व हेपॅटायटिस सी यांचा समावेश आहे. त्यापैकी बरेच रोग घातकदेखील आहेत. ते लक्षात घेता, लग्न करण्यापूर्वी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज टेस्ट (STDs चाचणी) करणे महत्त्वाचे आहे. कारण- लग्नानंतर हे आजार तुमच्या जीवनसाथीद्वारे तुमच्यापर्यंत पसरू शकतात.

मानसिक आरोग्य:

लग्नापूर्वी मानसिक आरोग्याशी संबंधित करण्यायोग्य कोणत्याही विशिष्ट चाचण्या नाहीत. पण, ते तपासल जाणे ही गरजेची गोष्ट आहे. अनेकदा मानसिक आरोग्य तपासणीतून तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे मानसिक आणि भावनिक आरोग्य कशा पद्धतीचे आहे ते समजते.

आणखी वाचा :

फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे : वाढत्या प्रदूषणामुळे रोगाची सूक्ष्म लक्षणे आपल्याला माहिती असणे आवश्यक

Chandra Grahan 2024 : रंगपंचमी दिवशी असणार चंद्र ग्रहण, सणावर होणार का परिणाम?

सिगरेटपेक्षा आठ पटींनी अधिक धोकादायक बिडी, आरोग्य तज्ज्ञांनी केला धक्कादायक खुलासा

Share this article