अयोध्या नगरीत दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येथील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येतात. पण अयोध्येतील फास्ट फूडची चव घेतल्याशिवाय नागरिक अयोध्येतून जात नाहीत. अयोध्येत जिलेबी प्रसिद्ध फूडपैकी एक आहे.
गरमागरम जिलेबी आणि दूध पिणे बहुतांशजणांना आवडते. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळच्या स्नॅक टाइमवेळीही जिलेबी आवडीने खाल्ली जाते. पण तुम्हाला माहितेय का, उत्तर प्रदेशात जिलेबी दह्यासोबत सर्व्ह केली जाते. अशातच अयोध्येतील प्रसिद्ध जिलेबी घरच्याघरी कशी तयार करायची याची रेसिपी पाहूया सविस्तर....
जिलेबीच्या बॅटरसाठी सामग्री
1 कप मैदा
2 चमचे बेसन पीठ
1/4 चमचे बेकिंग सोडा
1/2 कप दही
पाणी (आवश्यकतेनुसार)
तेल/तूप
पाक तयार करण्यासाठी सामग्री
1 कप साखर
1/2 कप पाणी
1/2 कप वेलची पावडर
फूड कलर
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, बेसन पीठ आणि बेकिंग सोडा मिक्स करुन घ्या. हळूहळू यामध्ये दही टाकत सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा. जिलेबीच्या बॅटरमध्ये गुढळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. याशिवाय बॅटर अधिक घट्ट किंवा पातळ करू नका.
जिलेबीचे बॅटर कमीत कमी पाच ते सहा तास अथवा रात्रभर तसेच झाकून आंबवण्यासाठी ठेवा. लक्षात ठेवा, बॅटर गरम ठिकाणी ठेवू नका. जिलेबीचे बॅटर दुसऱ्या दिवशी आंबल्यानंतर ते फुगले जाईल.
पाक तयार करण्यासाठी पॅन गॅसवर मंद आचेवर ठेवून त्यामध्ये साखर आणि पाणी मिक्स करा. साखरेचा पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर, केशर किंवा फूड कलर मिक्स करा. जाळीदार पाक तयार होईपर्यंत तो शिजवत राहा.
गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल किंवा तूप गरम करून घ्या. आता प्लास्टिकच्या पाइपिंग बॅगमध्ये बॅटर भरून जिलेबी गोलाकार आकारात तेलात टाकून तळून घ्या.
गरम तेलात किंवा तूपात जिलेबी दोन्ही बाजूंनी गोल्डन रंगाची होईपर्यंत तळून घ्या. जिलेबी तळून झाल्यानंतर साखरेच्या पाकात बुडवा.
साखरेच्या पाकात एक-दोन मिनिटे जिलेबी बुडवल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा. जिलेबीवर ड्राय फ्रुट्स किंवा दही टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
VIDEO : घरच्याघरी बनवा अशी जिलेबी, येथे पाहा संपूर्ण व्हिडीओ