
Women's World Cup 2025 : भारतीय महिला संघाने इतिहास रचत आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा तो चौथा संघ बनला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. भारताने 23 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडला डकवर्थ लुईस नियमानुसार 53 धावांनी पराभूत करून सेमीफायनलचे तिकीट मिळवले. आता भारताचा सेमीफायनलमधील सामना कोणाशी आणि केव्हा होणार आहे, चला जाणून घेऊया संपूर्ण वेळापत्रक...
भारतीय महिला संघाने सलग तीन पराभवानंतर शानदार पुनरागमन केले आणि न्यूझीलंडला धूळ चारली. पण सेमीफायनलमध्ये त्यांचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल. गट फेरीतील सामन्यांमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला आहे. त्यामुळे सेमीफायनलची लढत खडतर आहे.
गुणतालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियन संघ 11 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर 9 गुणांसह इंग्लंडचा संघ आहे. तर, भारत 6 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. नॉकआऊट सामन्यांपूर्वी सर्व संघांना गट फेरीतील प्रत्येकी एक सामना खेळायचा आहे. ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. तर, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला जाईल आणि भारताचा सामना बांगलादेशशी होईल. भारतीय संघ बांगलादेशकडून जिंकला तरी तो चौथ्या क्रमांकावरच राहील. पण पहिल्या दोन स्थानांमध्ये बदल होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी जो संघ जिंकेल तो पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.
आयसीसी महिला विश्वचषक 2025 चा पहिला सेमीफायनल सामना 29 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाईल. ज्यामध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल. दुसरा सेमीफायनल सामना गुणतालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये होईल. यानंतर तिसरा सेमीफायनल सामना 30 ऑक्टोबर रोजी डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये होईल. तर, 2 नोव्हेंबर रोजी आयसीसी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाईल.