Job Resignation: जॉईन होऊन एकच दिवस झाला, तरुणी म्हणाली 'राजीनामा देते, लॅपटॉप न्यायला घरी या'; CEO संतापला!

vivek panmand   | CMS
Published : Aug 09, 2026, 06:19 PM IST
laptop

सार

अनेक मुलाखतींच्या फेऱ्यांनंतर एका तरुणीला नोकरी मिळाली. तिने कंपनीसमोर काही अटीही ठेवल्या होत्या. पण जॉईन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने राजीनामा दिला. या धक्क्यातून कंपनी सावरत असतानाच, तिने पुढे जे सांगितलं ते ऐकून CEO चं डोकंच चक्रावून गेलं.

जयपूर (दि. ०९): काळ बदलला आहे आणि त्यासोबतच कामाची पद्धत आणि लोकांची मानसिकताही. कमी पगार, जास्त काम आणि वरून अटी घालणं, हे आजच्या पिढीला अजिबात आवडत नाही. दोन गोष्टी मनाविरुद्ध झाल्या की तिसऱ्या दिवशी ते कामावर येतही नाहीत. त्यामुळे आता कंपन्याही खूप विचार करूनच कर्मचारी निवडतात. असाच एक प्रकार जयपूरमध्ये घडला आहे. एका कंपनीने अनेक मुलाखती घेऊन, तरुणीने ठेवलेल्या सगळ्या अटी मान्य करून तिला कामावर घेतलं. पण तिने जॉईन केल्याच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. इतकंच नाही, तर कंपनीच्या लॅपटॉपबद्दल तिने जे उत्तर दिलं, ते ऐकून CEO सुद्धा चक्रावून गेले.

जयपूरमधील एका कंपनीचे CEO गौरव खेतारपाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. 'आजकालच्या तरुणांच्या अशा वागण्याला काय म्हणावं?' असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 'तिने पगारवाढ मागितली, आम्ही ती दिली. पण तिने फक्त राजीनामाच दिला नाही, तर व्यावसायिक मूल्यं काय असतात हेच तिला माहीत नाही,' असं म्हणत CEO चांगलेच संतापले आहेत.

तरुणीच्या सगळ्या मागण्या कंपनीने मान्य केल्या

CEO गौरव खेतारपाल यांनी हा संपूर्ण प्रकार शेअर केला आहे. ते म्हणाले, "आम्ही एका उमेदवारासाठी तीन महिने वाट पाहिली. अनेक मुलाखतींच्या फेऱ्यांनंतर, जॉईन व्हायला तीन महिने बाकी असताना तिने सांगितलं की २५,००० रुपये पगार तिला पुरणार नाही, तो ५०,००० रुपये करा. तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर शेवटच्या क्षणी दुसरा उमेदवार शोधणं कठीण होतं, म्हणून आम्ही तिची मागणी मान्य केली. ऑफर लेटर पाठवल्यावर तिने वैयक्तिक कारणांमुळे 'वर्क फ्रॉम होम' मागितलं. आम्ही तेही मान्य केलं. तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करून आम्ही तिला कामावर घेतलं."

कामावर रुजू होताच दुसऱ्या दिवशी राजीनामा

पहिल्या दिवशी तिने घरातूनच काम केलं. तिला कंपनीच्या सिस्टीमबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल माहिती देण्यात आली. यातच पहिला दिवस गेला. पण दुसऱ्या दिवशी ती तरुणी लॉगिनच झाली नाही. तिला फोन केले, पण तिने उचलले नाहीत. ईमेललाही उत्तर दिलं नाही. अखेर, बऱ्याच प्रयत्नांनंतर तिच्याशी संपर्क झाला. 'तू लॉगिन का नाही झालीस? फोन का उचलत नाहीस?' असं स्वतः CEO ने विचारल्यावर, तिने 'वैयक्तिक कारणांमुळे मला ही नोकरी सोडायची आहे,' असं उत्तर दिलं. तिच्या सगळ्या मागण्या मान्य करूनही एका दिवसात असं उत्तर आल्याने CEO संतापले.

'ऑफिसचा लॅपटॉप न्यायला घरी या'

साधारणपणे नोकरी सोडताना ऑफिसने दिलेला लॅपटॉप, आयडी कार्ड आणि इतर वस्तू ऑफिसमध्ये जाऊन परत कराव्या लागतात. CEO ने तिला ऑफिसचा लॅपटॉप आणि इतर वस्तू ऑफिसमध्ये आणून देण्यास सांगितलं. यावर ती तरुणी म्हणाली, "ऑफिसमधून कुणालातरी माझ्या घरी पाठवा आणि लॅपटॉप घेऊन जा." तिचं हे उत्तर ऐकून तोपर्यंत शांत असलेले CEO चांगलेच संतापले.

कायदेशीर कारवाईचा इशारा देताच सत्य समोर

संतापलेल्या CEO ने तिला थेट ईमेल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. कंपनीच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल, असं त्यांनी ईमेलमध्ये स्पष्ट केलं. कायदेशीर कारवाईचा ईमेल मिळताच ती तरुणी घाबरली आणि लगेच लॅपटॉप घेऊन ऑफिसमध्ये हजर झाली. तिथे चौकशी केल्यावर खरं कारण समोर आलं. तिने २५,००० रुपये जास्त पगारासाठी दुसऱ्या कंपनीत नोकरी स्वीकारली होती, हे उघड झालं.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Robinhood Stock: ट्रुइस्टने वाढवले टार्गेट, वॉल स्ट्रीटवरही चर्चा
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न! कालीघाटमधील धक्कादायक घटना