
Waqf Amendment Bill : लोकसभेत बुधवारी (2 मार्च) रात्री उशिरा 1 वाजल्याच्या आसपास वक्फ दुरुस्ती विधेयक बहुमताने पारित झाले. विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मतदान झाले. खरंतर, विधेयकावर लोकसभेत जवळजवळ 12 तासांपेक्षा अधिक वेळ चर्चा झाली. तर आज (3 मार्च) विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार आहे.
कोणत्याही धर्मात हस्तक्षेप नाही
रिजिजू यांनी बुधवारी दुपारी विधेयक सादर करत चर्चा सुरू केली होती. यावेळी रिजिजू यांनी म्हटले होते की, विधेयकाचा उद्देश कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करण्याचा नाही. तर वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याचा आहे. जुन्या कायद्यातील सर्वाधिक वादग्रस्त कलम 40 चा उल्लेखही रिजिजू यांनी केला. यावर रिजिजू म्हणाले की, कलम 40 अंतर्गत वक्फ बोर्ड कोणतीही जमीन वक्फ संपत्ती म्हणून घोषण करू शकत होता. न्यायाधिकरणच हे रद्द किंवा दुरुस्त करू शकत होता. हायकोर्टात अपील केले जाऊ शकत नव्हते. ते हटवण्यात आले आहे. मुस्लम समुदायाकडून कोणतीही जमीन बळकावली जाणार नाही. विरोधक दिशाभूल करत असल्याचेही रिजिजू म्हणाले.
दुसऱ्या बाजूला वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राहुल गांधी सर्वात आधी सदनातून बाहेर पडले. यानंतर अन्य राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या.
हा काळा दिवस- काँग्रेस खासदार इमरान मसूद
काँग्रेसचे खासदार आणि जेपीसी सदस्य इमरान मसूद यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावर प्रतिक्रिया देत म्हटले की, "हा काळा दिवस आहे. हा आमच्या हक्कांवर करण्यात आलेला हल्लाबोल आहे. यामध्ये मुस्लिम समुदाय आणि वक्फ हे दोघेही भरडले जाणार आहेत. हा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून लिहिला जाईल. आम्ही या विधेयकाच्या विरोधात लढाई करू."
भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची प्रतिक्रिया
भाजप खासदार भर्तृहरी महताब यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावर प्रतिक्रिया देत म्हटेल की, हे विधेयक मुस्लिमांच्या विरोधातील नाही. तर मुस्लिमांचे रक्षण करेल"
ऐतिहासिक विधेयक- प्रल्हाद जोशी
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मीडियाशी बोलताना विधेयकाबद्दल म्हटले की, "हे अत्यंत महत्वाचे आणि ऐतिहासिक विधेयक आहे. ही एक खूप मोठी सुधारणा आहे आणि सर्वांना न्याय मिळवून देईल..."
श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधेयकाबद्दल प्रतिक्रिया देत म्हटले की,"लोकसभेत आज एक क्रांतिकारी विधेयक मंजूर झाले आहे... हा सुधारणात्मक बदल आणल्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो... हे विधेयक गरीब मुस्लिमांना लाभ देईल..."
श्रीकांत शिंदे यांनी पुढे म्हटले की, “मणिपूरवरील चर्चा सुरू झाली तेव्हा राहुल गांधी हे घराबाहेर पडलेले पहिले व्यक्ती होते. जनतेने हे समजून घेतले पाहिजे की त्यांना फक्त राजकारण करायचे आहे...”