
मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मंझरा पूरब गावात पहाटे ४ च्या सुमारास एक अनपेक्षित पाहुणा आला. बेलरायन वनपरिक्षेत्रात येणाऱ्या या फार्महाऊसमध्ये जेव्हा बिबट्या घुसला, तेव्हा मालक गुरमीत सिंग गाढ झोपेत होते.
पहाटेच्या शांततेत अचानक गुरमीत सिंग यांचा पाळीव लॅब्राडोर कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. या आवाजाने सिंग यांना जाग आली. त्यांनी बाहेर डोकावून पाहिले असता, अंगणात एक बिबट्या शिरताना त्यांना दिसला.
फार्महाऊसवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची एन्ट्री कैद झाली आहे. या थरारक घटनेचा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.
बिबट्या अंगणात येताच लॅब्राडोर कुत्र्याने थेट त्याच्याशी पंगा घेतला. हा कुत्रा अजिबात घाबरला नाही. तो बिबट्यासमोर खंबीरपणे उभा राहिला आणि त्याच्यावर सलग भुंकत राहिला.
कुत्र्याचा हा आक्रमक अवतार पाहून बिबट्याने हल्ला करण्याऐवजी तिथून काढता पाय घेतला. कुत्र्याच्या या धाडसी उत्तरामुळे बिबट्या मागे फिरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही हल्ला झाला नाही. पण या संपूर्ण प्रसंगात लॅब्राडोर कुत्र्याचे निडर वागणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. एका जंगली प्राण्यासमोर कुत्र्याने दाखवलेल्या या अनपेक्षित धैर्याचे नेटकरी कौतुक करत आहेत.
बिबट्या मागे फिरल्याचे दृश्य जरी दिलासादायक असले, तरी या घटनेने वन्यजीव अधिवासाजवळ राहणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिबटे अनेकदा कुत्र्यांची शिकार करतात, त्यामुळे असा सामना पाळीव प्राण्यांसाठी खूप धोकादायक ठरू शकतो.
जंगलाला लागून असलेल्या मानवी वस्त्या आणि शेती परिसरात जंगली प्राणी घुसू शकतात, याची आठवण या घटनेने करून दिली आहे. लॅब्राडोरने जरी शौर्य दाखवले असले, तरी अशा मोठ्या हिंस्त्र प्राण्यांचा वावर असताना पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवावे आणि वन्यजीवांशी थेट सामना टाळावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.