
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील विद्यार्थी संवाद कार्यक्रमावर टीका केली. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडल्यानंतरच सरकारला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची आठवण झाल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांना ‘पेड इव्हेंट’ म्हटले जात असेल, तर भाजपचे कार्यक्रम आणि योजनाही ‘पेड इव्हेंट’ असल्याची टीका राऊत यांनी केली. यावेळी राऊत यांनी शालेय पोषण आहाराचा मुद्दाही उपस्थित केला. आंबेगावमधील शाळेत निकृष्ट दर्जाचे धान्य आणि वाटाणे दिल्याचा आरोप करत हा प्रकार समोर आणणाऱ्या शिक्षिका रेश्मा पारधी यांना निलंबित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या दबावानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आल्याचाही उल्लेख केला. पोषण आहाराच्या पुरवठादारांवर आणि कंत्राटदारांवर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शाळांमध्ये शिळे किंवा निकृष्ट अन्न खाल्ल्यामुळे विद्यार्थी आजारी पडल्याचे आणि विषबाधेचे प्रकार घडल्याचा दावा करत राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि पोषण आहाराच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.