
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांनी याबद्दलची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. सात वर्षांपूर्वी दोघेही लग्नबंधनात अडकले होते. दोघांनी वैयक्तिक कारणांमुळे घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं आहे. हैदराबाद येथील पुलेला गोपीचंद अकादमी येथे दोघांनी करिअरची सुरुवात केली आणि त्यांच्यात येथेच प्रेम फुललं होतं.
२०१८ मध्ये दोघांनी लग्न केलं होत. क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रेटी कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होत. त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्यामुळं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सायना नेहवाल हिने २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होत. त्यानंतर ती २०१५ मध्ये जागतिक प्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचली होती.
पारुपल्ली कश्यपने 2014 मध्ये ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आणि जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला. सायना लिहिते की, "कधी कधी आयुष्य आपल्याला वेगवेगळ्या दिशांना घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर पारुपल्ली आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांतता, प्रगती आणि दिलासादायक आयुष्याची निवड करत आहोत. मी सर्व चांगल्या आठवणींसाठी आभारी आहे आणि पुढे जाताना फक्त शुभकामना व्यक्त करते. या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद."
प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद यांच्यानंतर बॅडमिंटन खेळाला सायनानेच खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत तिने उपउपांत्यपूर्व फेरी गाठून बॅडमिंटन खेळात मुली मागे नाहीत हे सिद्ध करून दाखवलं होत. चार वर्षांनंतर 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली.
सायना नेहवाल हिने बॅडमिंटन खेळाला नवीन ओळख करून दिली. तिच्यानंतर पी व्ही सिंधू हिने दोन वेळा ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकले होते. सायना आणि कश्यप या दोघांची ओळख १९९७ ला झाली होती. त्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचे संबंध प्रेमात बदलले. २०१८ मध्ये दोघांचे लग्न होईपर्यंत हे दोघे रिलेशनमध्ये आहेत का नाही, हे कोणाला माहित नव्हते.