
इम्फाळ - बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना ULFA(I) ने दावा केला की भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर त्यांच्या तळांवर ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. मात्र, भारतीय लष्कराने या आरोपाचे स्पष्टपणे खंडन करत सांगितले आहे की, अशा कोणत्याही कारवाई करण्यात आलेली नाही.
ULFA(I) च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, म्यानमार सीमेवरील त्यांच्या मोबाईल कॅम्प्सवर पहाटेच्या सुमारास ड्रोन हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये त्यांचा एक वरिष्ठ नेता ठार झाला आणि सुमारे १९ सदस्य जखमी झाले. या हल्ल्यांमुळे संघटनेला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, भारतीय लष्कराच्या सूत्रांनी The Hindu या वृत्तपत्राशी संवाद साधताना हे स्पष्ट केले की, "भारतीय लष्कराकडून या भागात अशा प्रकारची कोणतीही अधिकृत मोहीम राबवण्यात आलेली नाही." त्यामुळे ULFA(I) चा दावा फेटाळण्यात आला आहे.
ULFA अर्थात United Liberation Front of Assam ही संघटना १९७९ पासून वेगळ्या आसामसाठी सशस्त्र संघर्ष करत आहे. या संघटनेच्या ‘I’ (Independent) गटाने भारत सरकारशी शांतता चर्चा नाकारून म्यानमार सीमेवरील जंगलांमध्ये आपले तळ उभारले आहेत. यापूर्वीही भारताने म्यानमार सरकारच्या सहकार्याने अनेकदा या भागात संयुक्त सैनिकी कारवाया केल्या आहेत.
या नवीन दाव्यामुळे पुन्हा एकदा भारत-म्यानमार सीमावर्ती सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ULFA(I) च्या दाव्यात तथ्य असल्यास, भारतीय लष्कराने अतिशय गुप्त आणि अचूक कारवाई केल्याचे सूचित होते. मात्र जर हे केवळ एक प्रचारकी युद्ध असेल, तर ULFA(I) आपल्या अंतर्गत अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या या आरोपावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रतिक्रिया आलेली नाही. याशिवाय म्यानमार सरकार व भारतीय लष्कर यांच्यात या संदर्भात उच्चस्तरीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की ईशान्य भारतातील दहशतवादाचा विषय अजूनही पूर्णतः संपलेला नाही आणि भारताला या भागातील सुरक्षेच्या बाबतीत अधिक सजग राहावे लागणार आहे.