
Rajnath Singh Statement on Pakistan Sindh Province : सध्या पाकिस्तानात असलेला सिंध प्रांत भारताच्या प्राचीन सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असताना राजनाथ सिंह यांचे हे विधान आले आहे. सिंध भविष्यात भारतात परत येऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले आहे.
सिंधी समाज संमेलनात बोलताना राजनाथ सिंह यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले. सध्याच्या सीमा काहीही असल्या तरी सिंध नेहमीच भारताच्या संस्कृतीचा भाग राहील. १९४७ च्या फाळणीपूर्वी सिंध हा भारताचा भाग होता, त्यानंतर तो पाकिस्तानचा भाग बनला. "आज सिंधची भूमी भारताचा भाग नसेल, पण संस्कृतीच्या बाबतीत सिंध नेहमीच भारताचा भाग राहील. जमिनीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सीमा बदलू शकतात. उद्या सिंध पुन्हा भारतात परत येणार नाही, हे कुणाला माहीत?" असा सवाल त्यांनी केला. आज जगात कुठेही राहत असले तरी, सिंधचे लोक नेहमीच भारताशी कौटुंबिक नाते जपतील, असेही ते म्हणाले.
सध्या पाकिस्तानात असलेला सिंध प्रांत हा सिंधी समाजाची खरी मातृभूमी आहे. याच ठिकाणी सिंधू संस्कृतीचा उगम झाला. फाळणीला अनेक वर्षे उलटूनही सिंधी हिंदूंचे सिंधसोबत असलेले भावनिक नाते यावर बोलताना त्यांनी भाजप नेते एल.के. अडवाणी यांचा उल्लेख केला. सिंध भारताचा भाग राहिला नाही, हे अडवाणींच्या पिढीतील सिंधी हिंदूंना आजही पूर्णपणे स्वीकारता आलेले नाही, असे ते म्हणाले. भारतातील हिंदू सिंधू नदीला पवित्र मानत होते. सिंधमधील अनेक मुस्लिमदेखील या नदीच्या पाण्याला मक्केतील 'आब-ए-झमझम' इतकेच पवित्र मानत होते, असे अडवाणींनी आपल्या लिखाणात म्हटले असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, राजनाथ सिंह यांच्या या विधानावर पाकिस्तान येत्या काही दिवसांत प्रतिक्रिया देईल, अशी अपेक्षा आहे.