VIDEO : ‘काँग्रेसच्या पडझडीने आनंद होत नाही’, राज्यसभेत PM मोदींचा मल्लिकार्जुन खर्गेंना चिमटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (7 फेब्रुवारी) राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावास उत्तर दिले. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणामध्ये नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर…

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेमध्ये बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर कोपरखळी घेतली. आगामी निवडणुकीमध्ये 400 जागा जिंकण्यासाठी NDAला आशीर्वाद दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी खर्गे यांचे आभार मानत, आपल्या शैलीमध्ये चिमटा देखील काढला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काही सहकाऱ्यांसाठी टीका करणे आणि कडवट बोलणे ही त्यांची मजबुरी होती. त्या दिवशी तर मी काही बोलू शकलो नाही, पण खर्गेजींचे विशेष आभार मानतो. त्या दिवशी खर्गेजींचे म्हणणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होतो. इतका आनंद मिळाला, असा आनंद अतिशय कमी वेळा मिळतो. लोकसभेमध्ये तर कधीकधीच आनंद मिळतो, पण हल्ली ते वेगळ्याच ड्युटीवर असल्याने मनोरंजन कमी होत आहे. लोकसभेमध्ये ज्या मनोरंजनाची उणीव भासत होती, ती त्या दिवशी तुम्ही पूर्ण केली".

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे असेही म्हणाले की, "खर्गे अतिशय आनंदाने व शांतपणे बोलत होते. बराच वेळही घेतला. मी विचार करत होतो की इतके बोलण्याचे स्वातंत्र्य त्यांना कसे मिळाले? नंतर माझ्या लक्षात आले की दोन खास कमांडर त्या दिवशी नव्हते आणि हल्ली नसतातच. म्हणूनच आदरणीय खर्गेंजींनी स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेतला. मला वाटतं त्या दिवशी खर्गेजींनी सिनेमातले एखादे गाणं ऐकले असावे, ऐसा मौका फिर कहां मिलेगा. अम्पायर नाही, कमांडो नाही, तर त्यांना चौकार-षटकार मारताना मजा आली. एक गोष्ट मात्र आनंदाची आहे, त्यांनी (मल्लिकार्जुन खर्गे) 400 जागा जिंकण्याबाबत एनडीएसाठी आशीर्वाद दिला.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर कोपरखळी

'पश्चिम बंगालमधून एक संदेश आला आहे की, काँग्रेस 40 जागा पार करू शकणार नाही. काँग्रेस 40 जागा वाचवू शकेल, याकरिता मी प्रार्थना करतो. माझा पक्का विश्वास झाला आहे की या पक्षाचे (काँग्रेस) विचार देखील कालबाह्य झाले आहेत. विचारच कालबाह्य झाल्याने त्यांनी आपले काम देखील आउटसोर्स करण्यास सुरु केले आहे. पाहता पाहता एवढा मोठा पक्ष, इतकी दशके देशावर राज्य करणाऱ्या पक्षाची अशी पडझड व्हावी, आम्हाला आनंद होत नाही. तुमच्याबाबत आमच्या संवेदना आहेत. पण डॉक्टर काय करणार, पेशंट स्वतःच… पुढे काय बोलू", असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल चढवला. 

VIDEO : मल्लिकार्जुन खर्गे यांनी नेमके काय म्हटले होते? ऐका 

काँग्रेसने देशाची मोठी जमीन शत्रूंना दिली

पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, “ज्या काँग्रेसने देशाची मोठी जमीन शत्रूंच्या ताब्यात दिली. ज्या काँग्रेसने देशाच्या सैन्याचे आधुनिकीकरण थांबवले. आज तेच आम्हाला अंतर्गत सुरक्षेवर भाषण देत आहेत. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस खूपच संभ्रमामध्ये आहे”.

एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेस पक्षावर हल्लाबोल चढवल्याचे पाहायला मिळाले.

आणखी वाचा :

संतापजनक! मित्रानेच मैत्रिणीवर केला बलात्कार; आठवडाभर केला छळ, अंगावर ओतायचा गरम डाळ

MP Harda Factory Blast : फटाके कारखान्याच्या मालकासह तिघांना अटक, स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू

LK Advani : BJPचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, PM नरेंद्र मोदींची घोषणा

Share this article