Swiggy Instamart : ऑनलाइन डिलिव्हरीसाठी लोकप्रिय असणाऱ्या स्विगी कंपनीने आपल्या वार्षिक ट्रेंड अहवालाबाबतची माहिती शेअर केली आहे. यंदा ग्राहकांनी कोणकोणत्या गोष्टी सर्वाधिक ऑर्डर केल्या? जाणून घ्या सविस्तर माहिती…
Swiggy News : ऑनलाइन डिलिव्हरीसाठी लोकप्रिय असणाऱ्या स्विगी कंपनीने आपल्या वार्षिक ट्रेंड अहवालाबाबतची माहिती शेअर केली आहे. या अहवालातील माहितीनुसार, सर्वाधिक ऑर्डर करण्यात आलेल्या सामग्रींमध्ये कांदे, टोमॅटो आणि कोथिंबीर अशा भाजीपाल्याचा समावेश आहे.
केवळ आवडता स्नॅक्स खरेदी करण्यापलिकडे ग्राहकांनी काही अन्य सामग्रीही खरेदी करण्यावर भर दिल्याचे या वर्षाच्या शेवटच्या अहवालात पाहायला मिळाले. चेन्नईतील एका व्यक्तीने कॉफी, ज्युस, कुकीज, नाचो आणि चिप्स यासारख्या गोष्टींवर एकूण 31 हजार 748 रुपये खर्च करून सर्वात मोठी ऑर्डर स्विगीला दिली.
तर जयपूरमधील एका व्यक्तीने एकाच दिवसात तब्बल 67 ऑर्डर देऊन विक्रम केला आहे. दिल्लीतील एका दुकानदाराने एका वर्षात तब्बल 12 लाख 87 हजार 920 रुपये खर्च करून किराणा मालावर तब्बल 1 लाख 70 हजार 102 रुपयांची बचत केली आहे.
प्रेमाचा गुलाबी महिना
फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना म्हणून प्रसिद्ध आहे. कारण या महिन्यात ‘व्हॅलेंटाइन डे’ हा प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. पण असे असतानाही वर्ष 2023मधील सप्टेंबर महिन्यात कंडोमच्या विक्रीने उच्चांक गाठल्याचे निदर्शनास आले.
वर्ष 2023मधील स्विगीच्या अहवालानुसार, सप्टेंबर महिना हा सर्वाधिक रोमँटिक महिना म्हणून उदयास आलाय, कारण या महिन्यात कंडोमच्या सर्वाधिक ऑर्डर्स कंपनीला मिळाल्या. दुसरीकडे 12 ऑगस्ट या एकाच दिवशीही कंडोमच्या सर्वाधिक जास्त ऑर्डर्स मिळाल्या होत्या. या दिवशी स्विगी इंस्टामार्टने ऑर्डर्सनुसार 5 हजार 893 इतके कंडोम वितरित केले.
विशेष म्हणजे कंडोमसोबतच स्विगी इंस्टामार्टवरून कांद्यांची सर्वाधिक ऑर्डर करण्यात आली. यापाठोपाठ केळी आणि चिप्स या साम्रगींचा क्रमांक लागतो.
पौष्टिक खाद्यपदार्थांच्या मागणीत वाढ
स्विगी इंस्टामार्टवरून पौष्टिक खाद्यपदार्थांची ऑर्डर करण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही पाहायला मिळाले. मखाणा या खाद्यपदार्थास सर्वाधिक पसंती मिळाली, वर्ष 2023मध्ये मखाण्याच्या 1.3 दशलक्ष ऑर्डर्स प्राप्त झाल्या. स्विगी कंपनीच्या निरीक्षणानुसार पौष्टिक खाद्यपदार्थ खरेदी करण्यावर ग्राहकांची भर असल्याचे दिसून आले.
या फळास सर्वाधिक पसंती
तर फळांमध्ये ग्राहकांनी आंबा हे फळ सर्वाधिक ऑर्डर केले. मुंबई, हैदराबादच्या तुलनेत बंगळुरू शहरात आंब्याची सर्वाधिक डिलिव्हरी करण्यात आली. फळांचा राजा आंबा खायला सर्वांनाच आवडते. त्यामुळे या फळाची लोकप्रियता पाहता तब्बल 36 टन आंबे 21 मे रोजी संपूर्ण देशभरात डिलिव्हर करण्यात आले.
ग्राहकांची पसंती
ऑगस्ट 2020पासून ‘स्विगी इंस्टामार्ट’ ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे. 25 हून अधिक शहरांमध्ये सक्रिय असलेल्या स्विगी कंपनीच्या ‘स्विगी इंस्टामार्ट’च्या आधुनिक तंत्रज्ञानाचा व विशेष डिलिव्हरी नेटवर्कचा लाभ ग्राहक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. कमीत कमी वेळेत देशभरातील ग्राहकांच्या घरापर्यंत किराणा सामान व अत्यावश्यक घरगुती वस्तू या कंपनीचे कर्मचारी पोहोचवत आहेत.
आणखी वाचा :
Savitri Jindal : देशातील सर्वात श्रीमंत महिला, कमाईमध्ये अंबानी-अदानींनाही सोडले मागे
AYODHYA राम मंदिरातील अखंड ज्योतीसाठी खास तूप कुठून मागवले जाते?
Exclusive : रामसेवेसाठी संपूर्ण जीवन केले समर्पित, सरकारी नोकरीही गमावली! जाणून या रामभक्ताची कहाणी