
केरळच्या कासारगोड जिल्ह्यात काही तरुणांनी चालत्या कारवर धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा व्हिडिओ बडियाडुक्का येथील असून रात्रीच्या वेळी शूट करण्यात आला आहे. यात गाडी चालवत असलेला तरुण चालत्या कारमधून बाहेर येऊन डान्स करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये ५ ते ६ तरुण रस्त्यावरच डान्स फ्लोअर बनवल्यासारखे नाचताना दिसत आहेत. कार पुढे जात असतानाच ड्रायव्हर आपली सीट सोडून रस्त्यावर उतरतो आणि डान्स करू लागतो.
दुसरा एक तरुण कारच्या बोनेटवर चढून डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तिसरा तरुण चालत्या कारच्या छतावर चढून नाचत आहे. याशिवाय आणखी दोन जण चालत्या गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
या स्टंटबाजीमुळे तरुणांनी स्वतःचा जीव तर धोक्यात टाकलाच, पण रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांसाठीही मोठा धोका निर्माण केला. कारवर कोणाचेही नियंत्रण नसताना ती पुढे जात होती, ज्यामुळे एखादा मोठा अपघात होऊ शकला असता.
सोशल मीडियावर या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या धोकादायक प्रकारावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सार्वजनिक रस्त्याचा वापर स्टंटबाजीसाठी केल्याबद्दल काहींनी तरुणांवर टीका केली, तर काहींनी उपहासात्मक कमेंट्स केल्या आहेत.
एका युजरने लिहिले की, असे वागणारे लोकच अपघातांना निमंत्रण देतात. दुसऱ्या एकाने टोमणा मारत म्हटले की, या तरुणांना पुन्हा कधीच गाडी चालवू देऊ नये. काहींनी या तरुणांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, अशा प्रकाराला मनोरंजन कसे मानले जाऊ शकते, असा सवालही उपस्थित केला आहे.
काहींना हा स्टंट मजेशीर वाटला असला तरी, बहुतांश लोकांनी यातील धोक्याकडे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमुळे बेदरकारपणे गाडी चालवण्याच्या प्रवृत्तीवर आणि रस्ते सुरक्षेच्या गांभीर्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सध्या तरी या प्रकरणी पोलिसांच्या कारवाईबाबत किंवा या तरुणांच्या ओळखीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.