भारतीय नौदलाने अपहरण झालेल्या जहाजाची सोमालियाच्या किनाऱ्यावरून सुखरूप सुटका केली आहे. भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांना कशा पद्धतीने धडा शिकवला, यासंबंधीचा व्हिडीओ देखील जारी करण्यात आला आहे.
Hijack Ship Rescue : भारतीय नौदलाने सोमालियामध्ये हायजॅक झालेल्या जहाजाची सुखरूप सुटका केली आहे. जहाज हायजॅक करणाऱ्या समुद्री चाच्यांना भारतीय नौदलाने चांगला धडा देखील शिकवला आणि सर्व भारतीयांसह 21 क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका देखील केली आहे. या कारवाई संबंधित व्हिडीओ देखील नौदलाकडून जारी करण्यात आला आहे.
बचाव कार्य करून नौदलाने समुद्री चाच्यांना इशारा दिल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सोमालियामध्ये MV LILA NORFOLK नावाच्या जहाजाचे अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर भारतीय नौदलाने तातडीने आयएनएस चेन्नई ही युद्धनौका या जहाजाच्या दिशेने रवाना केली होती.
स्पेशल कमांडो फोर्स मार्कोसचे ऑपरेशन
भारतीय नौदलाने या बचाव मोहीमेसाठी विशेषत: मरीन कमांडो युनिट मार्कोसची मदत घेतली. ऑपरेशन पार पाडल्यानंतर MV LILA NORFOLK या जहाजातून 15 भारतीयांसह एकूण 21 क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
भारतीय नौदलाच्या मार्कोसच्या तुकडीने यशस्वीरित्या जहाजावर उतरून जहाजाची समुद्री चाच्यांपासून सुटका केली.
समुद्री चाच्यांनी केले होते जहाजाचे अपहरण
मिळालेल्या माहितीनुसार, लायबेरिया देशाचा ध्वज असणाऱ्या जहाजाकडून यूकेएमटीओ पोर्टलला मेसेज पाठवण्यात आला होता. 4 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला आणि जहाजाचे अपहरण केली, अशी माहिती मेसेजद्वारे मिळाली होती. यानंतर भारतीय नौदलाने तात्काळ कारवाई करत आयएनएस चेन्नई युद्धनौका जहाजाच्या दिशेने रवाना केली.
तसेच एअरक्राफ्टच्या मदतीने कमांडो देखील जहाजाच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. योग्य संधी मिळताच कमांडो जहाजावर उतरले. अशा पद्धतीने यशस्वीरित्या बचाव मोहीम राबवून भारतीय नौदलाने जहाजावरील सर्वांची सुखरूप सुटका केली.
आणखी वाचा :
विमानात गर्भवतीसोबत सीट बदलण्यास त्याने दिला नकार, टीकेऐवजी नेटकऱ्यांनी दिला पाठिंबा