
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील ज्ञात-अज्ञात सेनानींना अभिवादन करत मराठवाड्याच्या इतिहासाचे स्मरण केले. पावसाच्या मोठ्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे पूर्ण करून मदत दिली जाईल आणि NDRFच्या मदतीपूर्वीही राज्य सरकारकडून मदत पोहोचवली जाईल, असे त्यांनी सांगितले. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन केल्याचेही फडणवीस म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत तीन याद्यांमधून 15 लाखांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासोबत सुमारे 48 हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिले रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फ्लड मिटिगेशन प्रकल्पातून सुमारे 30 TMC अतिरिक्त पाणी आणण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उल्हास खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात सुमारे 70 TMC पाणी आणण्याच्या नदीजोड प्रकल्पाचा DPR अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासोबत छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना, शेंद्रा-बिडकीन औद्योगिक विकास, EV उत्पादन, जालना ड्राय पोर्ट, रस्ते, वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयांसह मराठवाड्यातील विविध विकासकामांची माहिती त्यांनी दिली.