
दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत काढलेल्या मोर्चावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा नेणं म्हणजे लोकशाहीचा खून आणि न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं. या आंदोलनामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांनी मोर्चाची तुलना शिवतांडव आणि शिवबारातीशी केल्यावर शिंदेंनी हे शिवतांडव नसून हुल्लडबाजी असल्याचं म्हटलं. ही तुलना भगवान शंकराचा अपमान असल्याचा आरोप करत त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. मोर्चादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत गर्भवती महिला पत्रकार जखमी झाल्याच्या घटनेचाही शिंदेंनी निषेध केला. राहुल गांधी कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये राहण्यासाठी इतरांना धक्काबुक्की करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात अस्थिरता आणि अराजकता पसरवण्याचे प्रयत्न 140 कोटी जनता हाणून पाडेल, असंही शिंदे म्हणाले.