आपल्या रोजच्या वापरातल्या लिंबांची भारतात एक खास राजधानी आहे. देशात इतर कुठेही पिकणार नाहीत एवढी लिंबं इथे पिकतात. परदेशात निर्यात होणारं हे भारतातील एकमेव लिंबू आहे.
आपल्या स्वयंपाकघरात आपण रोज लिंबू वापरतो. सरबतापासून ते अनेक पदार्थांची चव वाढवण्यापर्यंत लिंबू खूप उपयोगी पडतं. पण या छोट्याशा लिंबामागे एका शहराचा इतिहास दडलेला आहे, यावर तुमचा विश्वास बसेल का? लिंबांची राजधानी कोणती? तिचं वैशिष्ट्य काय? आणि फक्त तिथेच मिळणारी खास लिंबं कोणती?
23
लँड ऑफ लेमन्स
भारतात कर्नाटकमध्ये लिंबांचं सर्वाधिक उत्पादन होतं. कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील 'इंडी' हा भाग 'लँड ऑफ लेमन्स' म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. इथे खास 'कागजी' लिंबू पिकतं, ज्याला 'इंडी लाईम' असंही म्हणतात. १९०० च्या सुरुवातीपासून उत्तर कर्नाटकातील इंडी आणि सिंदगी तालुक्यांमध्ये या कागजी लिंबाची लागवड सुरू झाली.
या भागाला 'लँड ऑफ लेमन्स' हे नाव कसं पडलं?
याचं मुख्य कारण म्हणजे इथे खूप मोठ्या प्रमाणावर लिंबाची शेती केली जाते. ICAR (भारतीय कृषी संशोधन परिषद) च्या अहवालानुसार, कर्नाटकातील एकूण लिंबू उत्पादनापैकी ५८% उत्पादन एकट्या विजयपुरा जिल्ह्यातून येतं. त्यातही 'इंडी' हा भाग या कागजी लिंबू उत्पादनाचं मुख्य केंद्र आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ इथे लिंबाची शेती होत असल्यामुळे या जातीला 'इंडी लाईम' हे नाव पडलं आहे. इथल्या लोकांचं उत्पन्नही याच लिंबू शेतीवर अवलंबून आहे.
33
इंडीमध्ये पिकणाऱ्या या कागजी लिंबाचं वैशिष्ट्य काय?
बाजारात मिळणाऱ्या सामान्य लिंबांपेक्षा इंडीमध्ये पिकणारं कागजी लिंबू खूप वेगळं असतं. या लिंबाची साल कागदासारखी अतिशय पातळ असते आणि आकारही मोठा असतो. या लिंबांमध्ये रस भरपूर असतो आणि सुगंधही खूप छान येतो. व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे लोणची, कोल्ड्रिंक्स आणि ज्यूस बनवण्यासाठी इंडी लिंबांना मोठी मागणी असते.
GI टॅग मिळालेलं लिंबू..
इंडी लिंबांच्या या प्रादेशिक वैशिष्ट्याला २०२३ मध्ये भौगोलिक मानांकन (GI टॅग) मिळालं आहे. विजयपुरा जिल्ह्यातील हवामान आणि तिथल्या मातीच्या गुणधर्मांमुळेच या लिंबांना एवढी खास चव आणि सुगंध मिळतो, हे या GI टॅगद्वारे अधिकृतपणे सिद्ध झालं आहे. ही ओळख मिळाल्यानंतर इंडी लिंबांनी आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगली ओळख निर्माण केली आहे. सध्या इथून यूएई, ओमान आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये ही लिंबं निर्यात केली जात आहेत.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.