पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्यावरील पोस्टवरून काँग्रेस वादात; भाजपसह मित्रपक्षांकडूनही तीव्र टीका

Published : Jul 09, 2026, 02:33 PM ISTUpdated : Jul 09, 2026, 02:48 PM IST
PM Modi and French President Emmanuel Macron jointly inaugurate the 'Bharat Innovates' event

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यातील व्हिडीओला महाराष्ट्र काँग्रेसने दिलेल्या कॅप्शनवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपने काँग्रेसवर महिलांविरोधी आणि अशोभनीय मानसिकतेचा आरोप केला आहे. 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील इंडोनेशिया दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर काँग्रेसकडून शेअर करण्यात आला. या प्रकरणात महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष वादाच्या कचाट्यात सापडला आहे. काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आलेल्या या पोस्टवर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह आणि अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप यामध्ये केला आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर विरोधी आघाडीतील काही नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यातील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये मोदी यांच्यासोबत इंडोनेशियाच्या संसद अध्यक्षा पुआन महारानी बसलेल्या दिसत होत्या. या पोस्टला "Control Uday, Control" असे कॅप्शन देण्यात आले होते. वाद निर्माण झाल्यानंतर ही पोस्ट हटवण्यात आली. मात्र, काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांच्या अकाउंटवर ही पोस्ट अद्याप असल्याचा दावा केला जात आहे. 
 

 

भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

या पोस्टनंतर भाजपच्या महाराष्ट्र युनिटने काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने व्हिडीओचा चुकीच्या पद्धतीने अर्थ घेतला. तसेच महिलांविरोधी मानसिकता कशी आहे हे दाखवून दिल्याचा आरोप भाजपने केला. भाजपने म्हटले की, भारताचे पंतप्रधान ज्या कार्यक्रमात 140 कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करत होते आणि ज्या देशाने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान दिला, त्या कार्यक्रमातील व्हिडीओचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आले.

 

शहजाद पूनावाला यांची टीका

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी या पोस्टला "अत्यंत घृणास्पद" म्हटले. काँग्रेसकडून सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा गेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर यापूर्वीही वैयक्तिक पातळीवर टीका करण्यात आली होती. याचा देखील उल्लेख शहजाद पूनावाला यांनी केला. 

भाजप महिला मोर्चाची प्रतिक्रिया

भाजप महिला मोर्चानेही या पोस्टचा निषेध केला. इंडोनेशियाच्या संसद अध्यक्षा पुआन महारानी यांच्याबाबत करण्यात आलेली टिप्पणी महिलांप्रती काँग्रेसची मानसिकता दर्शवते, असा आरोप महिला मोर्चाने केला. परदेशातील महिला नेत्या आणि भारताच्या पंतप्रधानांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले.

 

 

तजिंदर बग्गा यांचाही निशाणा

भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तजिंदर बग्गा यांनी काँग्रेसवर टीका केली. बग्गा यांनी म्हटले की, पक्षाचे अधिकृत सोशल मीडिया हँडल एखाद्या 'ट्रोल पेज'प्रमाणे वागत आहे. राजनैतिक कार्यक्रमातील व्हिडीओवरून खालच्या पातळीवरील राजकारण केल्यामुळे जनतेत काँग्रेसची प्रतिमा आणखी खराब होत असल्याचे त्यांनी म्हटले.

 

 

मित्रपक्षांकडूनही नाराजी

या वादावर काँग्रेसच्या मित्रपक्षांकडूनही प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या आणि माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या पोस्टवर नाराजी व्यक्त केली. "एखाद्या अधिकृत पक्षाच्या सोशल मीडिया हँडलसाठी अशी पोस्ट करणे योग्य नाही. राजकीय विरोधकांवर टीका करताना महिलांकडे वस्तू म्हणून पाहणे थांबवावे," असे त्यांनी म्हटले.

 

 

राजकीय वातावरण तापले

या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपने काँग्रेसवर राजकीय चर्चेची पातळी सोडल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकारामुळे राजकीय पक्षांनी सार्वजनिक संवादात अधिक जबाबदारी आणि सभ्यता पाळण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

उदय सामंत; रमेश म्हात्रेंच्या कृतीला शिवसेनेचा पाठिंबा नाही | Assault | Shivsena | Dombivli
पिंपरी-चिंचवडमध्ये भूस्खलन; प्रशासकीय इमारतीवर मातीचा ढिगारा | Landslide | Rain | PCMC