
नवी दिल्ली: देशाच्या जनगणना २०२७ (Census 2027) प्रक्रियेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि यावेळी ही जनगणना अनेक बाबतीत पूर्वीपेक्षा वेगळी असेल. देशात पहिल्यांदाच देशव्यापी जातनिहाय गणना केली जाणार आहे. याशिवाय, माहिती देणाऱ्या नागरिकांना त्यांच्या आई-वडिलांची जन्मतारीख आणि जन्मस्थानासारखी महत्त्वाची माहितीही विचारली जाऊ शकते. गृह मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. तर लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील बर्फाळ प्रदेशात ही जनगणना १ ते ३० सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी, १७ ते ३० ऑगस्ट दरम्यान नागरिकांना 'सेल्फ-एन्युमरेशन' (Self-Enumeration) म्हणजेच स्वतःच माहिती भरण्याची सुविधा मिळणार आहे. या काळात, लोक SE पोर्टलवर ऑनलाइन जाऊन स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकतील. म्हणजे, घरी येणाऱ्या गणकाची (Enumerator) वाट न पाहताही जनगणना पूर्ण करता येईल.
लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या बर्फाळ प्रदेशात लोकसंख्या मोजणी १ ते ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. त्याआधी सामान्य नागरिकांसाठी ही डिजिटल सुविधा तयार करण्यात आली आहे.
हे पण वाचा… VIDEO: बिहारमध्ये पंचायतीचा अजब न्याय, बलात्कार पीडितेलाच दोषी ठरवून थुंकी चाटायला लावली!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जातीची माहिती नागरिक देतील त्याप्रमाणेच नोंदवली जाईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २०११ च्या सामाजिक-आर्थिक जात जनगणनेत (SECC) तब्बल ४५ हजारांहून अधिक जातींची नावे समोर आली होती. यावेळी AI आणि डिजिटल साधनांच्या मदतीने ही आकडेवारी व्यवस्थित केली जाईल.
या जनगणनेत पहिल्यांदाच आई-वडिलांची जन्मतारीख आणि जन्मस्थानाची माहिती गोळा केली जाणार आहे. यामुळे नागरिकत्वाशी संबंधित आकडेवारीचे अधिक चांगले विश्लेषण करण्यास मदत होईल, असे मानले जात आहे. मात्र, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) प्रक्रिया यावेळच्या जनगणनेपासून वेगळी राहील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या नवीन बदलांमुळे Census 2027 केवळ लोकसंख्या मोजणीपुरती मर्यादित न राहता, सामाजिक आणि प्रशासकीय योजनांसाठी अधिक व्यापक डेटा गोळा करण्याचे एक माध्यम बनेल.
हे पण वाचा… PM मोदींच्या घरापर्यंत मोर्चा काढण्यावर केजरीवाल ठाम! E20 वरून आज मोठं शक्तीप्रदर्शन