
मुंबई : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने डाबर इंडिया लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. कंपनीच्या अनेक खाद्यपदार्थांवर '100% Natural', '100% Pure', '100% Purity Guaranteed' आणि '100% Organic' असे दावे करण्यात आले आहेत. मात्र याच्या माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल होत FSSAI च्या समोर आले आहे. यामुळे अशा दाव्यांसह विक्री होत असलेले प्रोडक्ट्स कंपनीला तात्काळ बाजारातून हटवण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
'या' उत्पादनांवर FSSAI ची कारवाई
एफएसएसआयच्या आदेशानुसार मध, अॅपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, गायीचे तूप, नारळ पाणी आणि नारळाचे दूध यांसह अनेक प्रोडक्ट्सवर '100%' असा दावा करण्यात आला होता. प्रोडक्ट्सवरील हे दावे अस्पष्ट, पडताळणी न करता येणारे आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे आहेत असे एफएसएसआयच्या निदर्शनात आले आहे.
एफएसएसआयने स्पष्ट केले की, अशा प्रकारचे दावे Food Safety and Standards (Advertising & Claims) Regulations, 2018 चे उल्लंघन करतात. खासकरुन डाबर होममेड कोकोनट मिल्क (Dabur Hommade Coconut Milk) वर "100% Purity" असा दावा करण्यात आला होता. याशिवाय डाबर हिमालयन ऑर्गेनिक अॅपल सायडर व्हिनेगर (Dabur Himalayan Organic Apple Cider Vinegar) आणि डाबर ऑर्गेनिक हनी (Dabur Organic Honey) अशा प्रोडक्ट्ससाठी अधिकृत एफएसएसआय ऑर्गेनिक मान्यता नसतानाही 'जैविक भारत' (Jaivik Bharat) लोगो वापरण्यात आला होता.
एफएसएसआयने यापूर्वीही डाबरला अशा दिशाभूल करणाऱ्या दाव्यांबाबत नोटीस बजावली होती. मात्र, समाधानकारक सुधारणा न झाल्याने आता संबंधित प्रोडक्ट्सची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कंपनीला 15 दिवसांच्या आत Action Taken Report (ATR) सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
डाबर इंडियाने एफएसएसआयची नोटीस मिळाल्याचे म्हटले आहे. सदर नोटिशीत नमूद केलेल्या वेबसाइटवरील मजकुराची तपासणी सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एफएसएसआयने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा आढावा घेतला जात असल्याचेही कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले.