
दसऱ्याच्या सणासाठी गावी जाण्यासाठी एका कर्मचाऱ्याने तिकीट बुक केले होते. पण आता तो गावी जाऊ शकेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण त्याच्या मॅनेजरने त्याला 'परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन' (PIP) वर टाकले आहे आणि त्याची सुट्टीही नाकारली आहे. हा कर्मचारी बंगळुरू येथील एका रिटेल कंपनीत काम करतो. तो चार महिन्यांपूर्वीच या कंपनीत रुजू झाला होता. सणासाठी त्याने ५,००० रुपये खर्च करून तिकीट काढले होते. पण अचानक झालेल्या परफॉर्मन्स रिव्ह्यूमुळे त्याचे सगळे प्लॅनिंग फिस्कटले. आता त्याला नोकरीची आणि गावी जाण्याची अशी दुहेरी चिंता सतावत आहे.
या कर्मचाऱ्याने रेडिटच्या (Reddit) r/developersIndia कम्युनिटीवर एक पोस्ट शेअर केली आहे. "मी दसऱ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत गावी जाण्याचं प्लॅनिंग केलं होतं. पण आज माझ्या मॅनेजरने मला पीआयपी (PIP) वर टाकलं," असं त्याने या पोस्टच्या शीर्षकात म्हटलं आहे. मॅनेजरने त्याला कामाचा दर्जा अपेक्षेप्रमाणे नसल्याचे सांगितले आणि त्यानंतर दोन दिवसांची सुट्टी देण्यासही स्पष्ट नकार दिला.
"आज माझा परफॉर्मन्स रिव्ह्यू होता. माझ्या कामाचा आउटपुट आणि परफॉर्मन्स अपेक्षेप्रमाणे नसल्याचे सांगत मॅनेजरने मला पीआयपीवर टाकले. त्यानंतर मी सणासाठी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी मागितली. पण मी पीआयपीवर असल्याने सुट्टी देता येणार नाही, असे सांगत त्याने माझा अर्ज फेटाळला," असे या कर्मचाऱ्याने सांगितले.
विशेष म्हणजे, पीआयपीबाबत अद्याप कोणताही अधिकृत मेल किंवा कन्फर्मेशन मिळाले नसल्याचेही या कर्मचाऱ्याने स्पष्ट केले. याआधी तो पीआयपीवर नसतानाही मॅनेजमेंटने त्याची सुट्टी नाकारली होती.
"आता मी काय करू? मी खूप कन्फ्युज आणि टेन्शनमध्ये आहे," असा सवाल त्याने विचारला आहे. आपण बऱ्याच दिवसांपासून गावी गेलो नाही आणि आई-वडील आपली आतुरतेने वाट पाहत आहेत, असेही त्याने या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक युजर्सनी त्याला कुटुंबाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, नवीन नोकरी शोधण्याची तयारीही सुरू करण्यास सांगितले आहे.
एका युजरने कमेंट केली की, "तू सरळ घरी जा. तो तुझ्या शाळेचा मुख्याध्यापक नाहीये, आणि तुला त्याच्या परवानगीची गरज नाही."
"घरी जा, सण एन्जॉय कर आणि दुसरी नोकरी शोधायला सुरुवात कर," असा सल्ला दुसऱ्या एका युजरने दिला. सुट्टीचा फायदा घेऊन कुटुंबासोबत वेळ घालव आणि नोकरी शोध, असेही त्याने सुचवले. पीआयपी हा नोकरीवरून काढण्याचा नवा ट्रेंड बनला आहे, असेही काहींनी म्हटले.
काहींनी त्याला राजीनामा देण्यापूर्वी आपल्या पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला दिला. जर पीआयपीचे टार्गेट पूर्ण करणे शक्य वाटत नसेल, तर लगेच दुसरी नोकरी शोधायला सुरुवात कर, असेही युजर्सनी सुचवले.
आणखी एका युजरने थेट शब्दांत परिस्थितीची जाणीव करून दिली. तो म्हणाला, "पुढची नोकरी शोधायला सुरुवात कर. तुझ्या मॅनेजरने आधीच आपला निर्णय पक्का केला आहे."