
मुंबई : रविवारी म्हैसूरमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केलं असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. 'एकूण ३९० कोटी रुपये किमतीचे १९२ किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले. यामध्ये ८ जणांना अटक करण्यात आली आहे' असे पोलिसांनी सांगितले.
याबाबत बोलताना उपपोलिस आयुक्त दत्ता नलवडे म्हणाले, 'म्हैसूरमधील कारवाईपूर्वी ८ कोटी रुपये किमतीचे ५ किलो मेफेड्रोन ड्रग्ज सापडले होते. म्हैसूरमधील कारवाईनंतर १८७ किलो मेफेड्रोन ड्रग्ज सापडले असून त्याची किंमत ३८२ कोटी रुपये आहे. एकूण ३९० कोटी रुपये किमतीचे १९२ किलो ड्रग्ज याठिकाणी सापडले आहे'.
'यावर्षी एप्रिलमध्ये पश्चिम मुंबईतील साकीनाका येथे ५२ ग्रॅम मेफेड्रोनसह एका व्यक्तीला अटक केल्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि त्याच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी आणखी तीन जणांना शोधून काढले. त्यांच्याकडून ८ कोटी रुपये किमतीचे ४.५३ किलोग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले' असे ते म्हणाले.
'याबाबत अधिक तपास केला असता जुलै २५ रोजी बांद्रा रिक्लेमेशन येथील सलीम इम्तियाज शेख उर्फ सलीम लँडगा (४५) याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिस म्हैसूरला गेले. म्हैसूर रिंग रोडवरील इमारतीचा पुढचा भाग हॉटेल आणि गॅरेजसारखा दिसत होता. मात्र, आत गेल्यावर आम्हाला मेफेड्रोन उत्पादन युनिट सापडले. येथून बेकायदेशीरपणे मुंबई आणि जवळच्या जिल्ह्यांमध्ये पुरवठा केला जात होता. आम्ही ८ जणांना अटक केली असून ३९० कोटी रुपये किमतीचे १९२ किलो मेफेड्रोन जप्त केले आहे' अशी माहिती उपायुक्तांनी दिली.
'मैसूरमधील ही कारवाई जुलै २६ रोजी झाली असून शेखसह आणखी ३ जणांना अटक करण्यात आली आहे' असे ते म्हणाले. 'ही एक मोठी साखळी असून आणखी अटक होऊ शकते. मेफेड्रोन बनवण्यासाठी त्यांना कुठून कच्चा माल मिळाला हे आम्ही तपासत आहोत. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या ८ जणांवर अंमली पदार्थ आणि मानसिक उत्तेजक पदार्थ (एनडीपीएस) कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत' असे नलवडे म्हणाले.