
देवघर (झारखंड) : झारखंडच्या देवघर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. श्रावण महिन्यात बाबा बैद्यनाथ धाम दर्शनासाठी निघालेल्या कावड यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस भरधाव वेगात समोरून येणाऱ्या गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात १९ कावडीयांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना मंगळवारी (२९ जुलै) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. देवघर जिल्ह्यातील गोड्डा-देवघर मुख्य मार्गावर, मोहनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, जंगल परिसरात ही भीषण धडक झाली. कावड यात्रा करणारे हे भाविक बसमधून देवघरच्या दिशेने निघाले होते. त्या वेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकवर बसने समोरुन धडक दिली.
अपघात जंगल भागात झाल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस, अग्निशमन दल व आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींना देवघरमधील मोठ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने तातडीने परिसरातील सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, बस ज्या ट्रकवर आदळली तो ट्रक गॅस सिलिंडर घेऊन जात होता. त्यामुळे अपघातानंतर भीषण स्फोट होण्याचा धोका होता. मात्र सुदैवाने गॅस सिलिंडरना आग लागली नाही आणि मोठा अनर्थ टळला. तरीही वाहन चक्काचूर होण्यासह अनेक मृतदेहांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.
सध्या झारखंडमधील प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ मंदिरात श्रावणी मेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. झारखंडसह बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक देवघरला येतात. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी लाखोंची गर्दी होते. त्यामुळे अनेक राज्यांतून खासगी व सार्वजनिक वाहने भाविकांना घेऊन ये-जा करत असतात.
मृतांपैकी बऱ्याच जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. बसमधून प्रवास करणारे भाविक वेगवेगळ्या राज्यांमधून आले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना कळवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाने मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.
या अपघातानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, "या अपघातामुळे माझे मन अत्यंत व्यथित झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. सर्व जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री केली जाईल. प्रशासनाने मदतीचे उपाय तत्काळ सुरु करावेत."
या अपघातानंतर केंद्र सरकारकडूनही आर्थिक मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मृतांच्या नातेवाईकांना सांत्वनपर मदत आणि जखमींना मोफत उपचार मिळण्यासाठी राज्य आणि केंद्र शासन समन्वय साधत आहेत.
या अपघातामुळे कावड यात्रेदरम्यान वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. श्रावण महिन्याच्या काळात भाविकांची प्रचंड गर्दी आणि वाहतूककोंडी दिसून येते. अनेक वाहने ओव्हरलोड असतात, चालकांमध्ये विश्रांतीचा अभाव आणि रस्त्यांची खराब अवस्था ही देखील मोठ्या अपघातांची कारणे ठरतात.