
आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण सतीश यांना नेमकं काय झालं होतं? सकाळपर्यंत जो माणूस खूप आनंदी होता आणि आपल्या मित्राला फोटो पाठवून फिटनेस दाखवत होता, त्याचा अचानक मृत्यू कसा झाला? 'भूतनाथ' आणि 'कल किसने देखा' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक विवेक शर्मा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मृत्यूचे खरे कारण सांगितले आहे.
विवेक शर्मा यांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, त्यांचे सतीश शाह यांच्याशी नेहमी बोलणे व्हायचे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेत्याने त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर संवाद साधला आणि सुमारे दोन-अडीच तासांनंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आली. त्यांनी काही चांगले मेसेज पाठवले होते. विवेक शर्मांच्या मते, "त्यांनी सेल्फी पाठवून लिहिले होते, 'बघ, किती वजन कमी झालंय, किती हँडसम झालोय.'" शर्मा पुढे म्हणाले की, सतीश यांना कदाचित त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती. त्यांना आपल्या जवळच्या लोकांना भेटायचे होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, सतीश त्यांना भेटू शकले नाहीत. सतीश यांनी विवेक यांना विचारले होते की ते घरी का येत नाहीत, तेव्हा त्यांनी सांगितले की डॉक्टरांनी त्यांना भेटण्यास मनाई केली आहे.
विवेक यांनी याच मुलाखतीत सांगितले की, सतीश बऱ्याच काळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांचे डायलिसिस झाले होते आणि त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. शनिवारी सकाळी जेव्हा सतीश यांनी व्हॉट्सॲपवर संवाद साधला, तेव्हा विवेक यांना सर्व काही ठीक असल्याचे वाटले. पण दुपारी दीडच्या सुमारास जेवण झाल्यावर ते टेबलवर कोसळले. त्यांच्यासोबत राहणारे रमेश त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात घेऊन गेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. किडनी निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा बातम्यांमध्ये केला जात आहे.
विवेक शर्मा यांनी सांगितले की, सतीश शाह नोव्हेंबर २०२५ मध्ये पुन्हा कामाला सुरुवात करणार होते. ते त्यांची फिल्म सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सतीश शाह यांनी विवेक शर्मा दिग्दर्शित 'भूतनाथ'मध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांची भूमिका साकारली होती. तर 'कल किसने देखा' मध्ये ते वैशाली देसाईच्या वडिलांच्या म्हणजेच विनोद कपूरच्या भूमिकेत दिसले होते.