
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते रजनीकांत आणि धनुष यांच्या घराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. २८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या डीजीपी कार्यालयाला एक ईमेल आला. त्यात चेन्नईच्या पोएस गार्डनमध्ये अभिनेते रजनीकांत आणि धनुष यांच्या घरांवर आणि किलपक्कममध्ये तामिळनाडू काँग्रेस नेते सेल्वापेरुंथकई यांच्या घरावर बॉम्ब लावल्याचे म्हटले होते. धमकीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, धमकीचा ईमेल आल्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि श्वानपथकाला रजनीकांत आणि धनुष यांच्या घरी पाठवून झडती घेण्यात आली. यासोबतच पोएस गार्डनमध्ये रजनीकांत आणि धनुष यांच्या घराभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, बराच वेळ शोध घेतल्यानंतरही कोणताही बॉम्ब सापडला नाही, ज्यामुळे ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले. तथापि, पोलीस या प्रकरणाला गांभीर्याने घेत असून धमकीच्या ईमेलच्या स्रोताचा तपास सुरू केला आहे.
सायबर गुन्हे अधिकारी ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी ऑनलाइन नजर ठेवून आहेत. खोट्या धमक्यांच्या वाढत्या प्रकारामुळे पोलीस आणि सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. तामिळनाडूमध्ये राजकीय नेते आणि अभिनेत्यांच्या घरांना लक्ष्य करून बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी विजय, त्रिशा, नयनतारा आणि इतर अनेक कलाकारांच्या घरांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. प्रत्येक वेळी तपासानंतर या धमक्या खोट्या ठरल्या असल्या तरी पोलीस प्रत्येक धमकीला गांभीर्याने हाताळतात. अशी खोटी माहिती पसरवून भीती निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.