
Bigg Boss 19 Nomination: ‘बिग बॉस १९’ च्या नॉमिनेशनमध्ये या आठवड्यात सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. घरातील दोन सदस्यांनी एक चूक केली आणि त्याचा फटका संपूर्ण घराला सहन करावा लागला. होय, या आठवड्यात एक-दोन नव्हे, तर कॅप्टनला सोडून घरातील सर्व सदस्य एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत. विशेष म्हणजे हा निर्णय घरातील सदस्यांनी नाही, तर स्वतः बिग बॉसने घेतला आहे. गेल्या आठवड्यातच बसीर अली आणि नेहल चुडासमा डबल इविक्शनमुळे घरातून बाहेर पडले आहेत. त्यानंतर दोन वाइल्ड कार्ड स्पर्धकांसह घरात १२ सदस्य उरले आहेत.
'बिग बॉस'च्या घरात सध्या १२ स्पर्धक आहेत, ज्यात कुनिका सदानंद, गौरव खन्ना, फराहाना भट्ट, अमाल मलिक, तान्या मित्तल, नीलम गिरी, प्रणीत मोरे, अशनूर कौर, अभिषेक बजाज, मृदुल तिवारी, शहबाज बदेशा आणि मालती चाहर यांचा समावेश आहे. मृदुल सध्या घराचा कॅप्टन आहे, ज्यामुळे त्याला नॉमिनेशनमध्ये इम्युनिटी मिळाली आहे. म्हणजेच तो सुरक्षित आहे. उर्वरित ११ सदस्यांपैकी एक किंवा दोन जण या आठवड्याच्या शेवटी घराबाहेर जाऊ शकतात.
घडले असे की, 'बिग बॉस'ने सर्व घरातील सदस्यांना असेम्बली रूममध्ये बोलावले. तिथे त्यांनी अशनूर आणि अभिषेकचे दोन व्हिडिओ दाखवले, त्यापैकी एकात ते माइक झाकून एकमेकांशी कुजबुजत होते. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दोघे स्विमिंग पूलमध्ये मजा करताना दिसले. साहजिकच, यावेळी त्यांच्या गळ्यात माइक नव्हता. तरीही ते कुणाला ऐकू येणार नाही अशा प्रकारे कुजबुजत होते. 'बिग बॉस'ने व्हिडिओमध्ये तीन वेळा कुजबुजून बोलू नका असे सांगितले. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. 'बिग बॉस'च्या घरात कुजबुजणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाते. यामुळे 'बिग बॉस'ने आधी अशनूर आणि अभिषेकला असेम्बली रूममधून बाहेर पाठवले आणि उर्वरित घरातील सदस्यांना विचारले की, दोघांना शिक्षा म्हणून थेट नॉमिनेट करावे का.
घरातील अर्धे सदस्य अशनूर आणि अभिषेकला थेट नॉमिनेट करण्याच्या निर्णयाशी सहमत नव्हते, तर अर्ध्या सदस्यांना ते मान्य होते. त्यामुळे सर्व सदस्य मिळून एकमताने निर्णय घेऊ शकले नाहीत. यानंतर चेंडू कॅप्टन मृदुलच्या कोर्टात आला आणि त्याला निर्णय घेण्यास सांगितले. पण तोही अशनूर आणि अभिषेकला नॉमिनेट करण्याचा निर्णय घेऊ शकला नाही. तेव्हा 'बिग बॉस'ने निर्णय स्वतःच्या हातात घेतला आणि संपूर्ण घराला नॉमिनेट केले. आता या आठवड्यात एलिमिनेशनची टांगती तलवार कोणावर पडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.