
Katrina Kaif-Vicky Kaushal Welcome Baby Boy : मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कतरिना कैफ आई झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे. बाबा झालेल्या विकी कौशलने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून आपला आनंद व्यक्त केला. त्याने लिहिले - ब्लेस्ड ओम. यासोबतच त्याने एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात लिहिले आहे - 'आमच्या आनंदाचा ठेवा आला आहे. खूप सारे प्रेम आणि आशीर्वादाने आम्ही आमच्या मुलाचे स्वागत केले आहे. ७ नोव्हेंबर २०२५. कतरिना आणि विकी.' त्याच्या या पोस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटींकडून सतत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कतरिना कैफ बऱ्याच काळापासून चित्रपट आणि लाइमलाइटपासून दूर होती. त्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मध्येच ती स्पॉट झाली तेव्हा तिचा बेबी बंप दिसला होता. मात्र, तिने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी सर्वांपासून लपवून ठेवली होती. याच वर्षी नवरात्रीच्या मुहूर्तावर या जोडप्याने आपापल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ते लवकरच पालक होणार असल्याची माहिती दिली होती. एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला होता, ज्यात कतरिना बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत होती आणि विकी तिला सांभाळताना दिसत होता. आता हे जोडपे एका मुलाचे आई-बाबा झाले आहेत. त्यांना माधुरी दीक्षित, हुमा कुरेशी, मनीष मल्होत्रा, सागरिका घाटगे, गुनीत मोंगा, अर्जुन कपूर, नेहा धुपिया, करीना कपूर, करण जोहर, आयुष्मान खुराना, अनिल कपूर, सोनम कपूर, श्रेया घोषाल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले होते. या जोडप्याचे लग्न राजस्थानच्या सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा येथे झाले होते. या लग्नाला त्यांचे खास मित्र, कुटुंबीय आणि बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी उपस्थित होते. लग्नानंतर हे जोडपे मुंबईत एक भव्य रिसेप्शन देणार असल्याची बातमी होती, पण कोरोनामुळे ते रद्द करावे लागले. त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचे झाल्यास, दोघांनीही याची कोणालाच कल्पना येऊ दिली नव्हती. मात्र, विकी अनेकदा रात्री उशिरा कतरिनाच्या अपार्टमेंटबाहेर दिसायचा, ज्यामुळे ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. विशेष म्हणजे, दोघांनी अद्याप एकत्र कोणताही चित्रपट केलेला नाही.