
Veteran Actress and Singer Sulakshana Pandit Passes Away : मनोरंजन विश्वातून एकामागून एक हृदयद्रावक बातम्या समोर येत आहेत. गुरुवारचा दिवस मोठा धक्का देणारा ठरला. आधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आणि त्यानंतर बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे गुरुवारी रात्री ८ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली. दरम्यान, सुलक्षणा यांचे संगीतकार भाऊ ललित पंडित यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण सांगितले आहे. त्या ७१ वर्षांच्या होत्या.
गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्याबद्दल त्यांचे भाऊ ललित पंडित यांनी सांगितले की, अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी मिड डेला सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी रात्री ८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ललित यांनी माहिती दिली की, त्यांचे अंत्यसंस्कार शुक्रवारी दुपारी १२ वाजता केले जातील. सुलक्षणा या ७०-८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी गायनासोबतच अभिनयातही आपले कौशल्य दाखवले होते. संगीत घराण्याशी संबंधित असलेल्या सुलक्षणा यांनी वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी गाण्यास सुरुवात केली होती.
सुलक्षणा पंडित यांनी बालगायिका म्हणून १९६७ मध्ये आलेल्या 'तकदीर' चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्यासोबत 'सात समंदर पार से' हे गाणे गायले होते. १९७६ मध्ये 'संकल्प' चित्रपटातील 'तू ही सागर तू ही किनारा' या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यांनी किशोर कुमार, हेमंत कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, शैलेंद्र सिंग, येसुदास, महेंद्र कपूर आणि उदित नारायण यांसारख्या गायकांसोबत गाणी गायली. गायनासोबतच त्यांनी अभिनयातही नशीब आजमावले. त्यांनी १९७५ मध्ये आलेल्या 'उलझन' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांच्यासोबत संजीव कुमार मुख्य भूमिकेत होते. त्यांनी संकल्प, राजा, सलाखें, हेरा फेरी, शंकर शंभू, बंडलबाज, संकोच, अपनापन, कसम खून की, अमर शक्ती, खानदान, वक्त की दीवार, दो वक्त की रोटी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी राजेश खन्ना, जितेंद्र, विनोद खन्ना, शशी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले होते.
१९५४ मध्ये जन्मलेल्या सुलक्षणा पंडित यांना संगीत वारशाने मिळाले, शास्त्रीय गायक पंडित जसराज हे त्यांच्या घरातील सर्वात प्रतिष्ठित संगीतज्ञ होते. त्या संगीतकार जोडी जतिन-ललित यांची बहीण होत्या. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांनी पार्श्वगायन सुरू केले होते. १९७५ मध्ये 'संकल्प' चित्रपटातील 'तू ही सागर है तू ही किनारा' या गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
सुलक्षणा पंडित यांना अनलकी देखील म्हटले जाते. त्या दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांच्यावर खूप प्रेम करत होत्या, पण संजीव कुमार यांनी त्यांना कधीही होकार दिला नाही. ते त्यावेळी हेमा मालिनी यांच्या प्रेमात होते. सुलक्षणा त्यांना मनवण्याचा प्रयत्न करत राहिल्या. दरम्यान, संजीव कुमार यांचे अकाली निधन झाले. यानंतर त्यांचे मानसिक संतुलनही बिघडले. सुलक्षणा यांची बहीण विजेताने बहिणीच्या मानसिक त्रासाला संजीव कुमार यांना जबाबदार धरले होते.