
अयोध्या: भाजपचे प्रवक्ते राजनीश सिंह यांनी लवकरच प्रदर्शित होणाऱ्या बॉलिवूड चित्रपट ‘द ताज स्टोरी’ विरुद्ध माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे (CBFC) तक्रार दाखल केली आहे. त्यांचा आरोप आहे की या चित्रपटाची कथा त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आधारित आहे, ज्यात त्यांनी ताजमहालातील २२ बंद खोल्या उघडण्याची मागणी केली होती.
ऑक्टोबर 2022 मध्ये राजनीश सिंह यांनी इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी ताजमहालातील २२ बंद खोल्या उघडून त्या ठिकाणाचा ऐतिहासिक सत्य उघड करण्यासाठी ASI (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग) यांचा समावेश असलेली समिती गठित करण्याची मागणी केली होती. त्यांचा दावा होता की ताजमहाल मूळतः एक प्राचीन मंदिर होते. मात्र, ही याचिका मे 2022 मध्ये न्यायालयाने फेटाळून लावली.
राजनीश सिंह यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे, “मी ताजमहालातील २२ बंद खोल्या उघडण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. माझा हेतू फक्त पारदर्शकता आणणे आणि ऐतिहासिक तथ्यांची पडताळणी करणे एवढाच होता.” त्यांनी असा आरोप केला आहे की ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटाचे पोस्टर्स, प्रचार साहित्य आणि कथानक त्यांच्या न्यायालयीन याचिकेचा भ्रामक संदर्भ देतात, आणि तेही त्यांच्या परवानगीशिवाय.
सिंह यांनी सांगितले, “हा माझ्या बौद्धिक आणि कायदेशीर अधिकारांचा भंग आहे. न्यायालयीन विषयाचा व्यावसायिक वापर करणे योग्य नाही.” त्यांनी चित्रपटावर तत्काळ सेन्सॉर प्रक्रिया आणि सार्वजनिक प्रदर्शनावर स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, चित्रपटाच्या कथानकाची चौकशी करून त्यात त्यांच्या याचिकेचा किंवा इतर बौद्धिक सामग्रीचा परवानगीशिवाय वापर झाला आहे का, हे तपासण्याची मागणी केली आहे.
‘द ताज स्टोरी’ हा हिंदी भाषेतील कोर्टरूम ड्रामा चित्रपट असून, त्याचे लेखन व दिग्दर्शन तुषार अमरीश गोयल यांनी केले आहे, तर निर्मिती सुरेश झा यांनी केली आहे. या चित्रपटात परेश रावल, जाकीर हुसेन, अमृता खानविलकर, नमित दास आणि स्नेहा वाघ प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून, त्यावर मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहींनी त्याच्या संकल्पनेचे कौतुक केले असले तरी काहींनी हा चित्रपट संवेदनशील विषयाला स्पर्श करत असल्याने सामाजिक तणाव वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.