
मुंबई : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन झाले आहे. 31 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या उत्साहात हे धक्कादायक वृत्त समोर आले. कर्करोगाशी लढा देत असताना अखेर रविवारी सकाळी तिची प्राणज्योती मालवली.
कॅन्सरशी दोन वर्षांपासून झुंज
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया मराठे मागील दोन ते अडीच वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. मीरा रोड येथील राहत्या घरी रविवारी पहाटे चार वाजता प्रियाचा मृत्यू झाला. त्या ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची सून आणि अभिनेते शंतनू मोघे यांची पत्नी होती. प्रियाने मागील वर्षभरापासून सोशल मीडियावरही फारशी सक्रियता दाखवली नव्हती. 11 ऑगस्ट 2024 रोजी त्यांनी शेवटचा पोस्ट शेअर केला होता.
अभिनय कारकिर्दीची झळाळती वाटचाल
प्रियाने 'या सुखांनो या' या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले. त्यानंतर 'चार दिवस सासूचे', 'तू तिथं मी', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण', 'येऊ कशी मी नांदायला' अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली.
तिने 'तू तिथे मी', 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकांमधून नकारात्मक भूमिका साकारल्या. विशेषत: 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतील तिची ‘मोनिका’ ही भूमिका प्रचंड गाजली. मात्र ही मालिका तिने अर्ध्यावर सोडली होती.
हिंदी मालिकांमधूनही लोकप्रियता
मराठीसोबतच प्रियाने हिंदी मालिकांमधूनही मोठी लोकप्रियता मिळवली. 'पवित्रा रिश्ता', 'उतरन', 'कसम से', 'बडे अच्छे लगते हैं' अशा मालिकांमधून तिच्या अभिनयाने ती घराघरात पोहोचली होती. आपल्या गोड व्यक्तिमत्त्व आणि दमदार अभिनयाने प्रियाने मराठी तसेच हिंदी प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते.
Priya Marathe dies : ठाण्याची प्रिया मराठे, अंधेरीत पडली प्रेमात, अशी होती शंतनूसोबतची लव्हस्टोरी
वैयक्तिक आयुष्य
2012 साली प्रिया आणि शंतनू मोघे यांनी विवाह केला. या दोघांनी 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत एकत्र कामही केले होते. त्यांचे वैयक्तिक आयुष्य आनंदी असतानाच आजारपणामुळे प्रियाने सर्वांमधून आता एक्झिट घेतली आहे.
Priya Marathe Passed Away : सुबोध भावेने शेअर केली भावनिक पोस्ट, तिच्यासोबत होते विशेष नाते