नेपाळच्या राष्ट्रध्वजात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक रंगाला विशेष महत्त्व आहे. यातील लाल रंग हा त्यांचा राष्ट्रीय रंग मानला जातो. तो धैर्य आणि विजयाचं प्रतीक आहे. नेपाळचं राष्ट्रीय फूल 'लालीगुरांस' (Rhododendron) हे सुद्धा लाल रंगाचंच असतं. तर झेंड्याच्या कडेला असलेला गडद निळा रंग शांतता आणि एकतेचं प्रतीक मानला जातो.
वरच्या त्रिकोणातील चंद्रकोर आणि खालच्या त्रिकोणातील सूर्याचं चिन्हही खास आहे. चंद्र हा शांतता आणि शितलतेचं प्रतीक मानला जातो, तर सूर्य हा ऊर्जा, उष्णता आणि खंबीरपणाचं प्रतीक आहे. जोपर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत नेपाळ देश अबाधित राहावा, अशी या चिन्हांमागची भावना आहे.
नेपाळच्या झेंड्यावरील चिन्हांची खासियत
या झेंड्याचं बारकाईने निरीक्षण केल्यास चंद्रकोरीत १६ पैकी ८ किरणं दिसतात. तसेच खालच्या भागातील सूर्याला १२ किरणं आहेत. या तपशीलांचा स्पष्ट उल्लेख नेपाळच्या संविधानातील कलम ८ मध्ये करण्यात आला आहे. एवढंच नाही तर हा झेंडा कोणत्या मापाचा आणि कसा बनवायचा हे सुद्धा संविधानाच्या अनुसूची १ मध्ये स्पष्ट केलं आहे. म्हणजेच हा झेंडा फक्त आकारानेच वेगळा नाही, तर त्याच्या निर्मितीचेही विशिष्ट नियम आहेत.
थोडक्यात सांगायचं तर, नेपाळचा राष्ट्रध्वज ही केवळ देशाची ओळख नाही, तर तो देशाचा इतिहास, परंपरा, संस्कृती आणि राष्ट्रीय भावनांचं प्रतीक आहे. म्हणूनच जगातील इतर सर्व देशांचे झेंडे एकाच प्रकारचे असले तरी, नेपाळचा झेंडा आपल्या अनोख्या आकारामुळे वेगळा ठरतो.